Mon, Mar 2, 2026
सामाजिक

बावधन गावचे बगाड एक ऐतिहासिक ग्रामीण संस्कृतीचा ठेवा.

बावधन गावचे बगाड एक ऐतिहासिक ग्रामीण संस्कृतीचा ठेवा.
Ashok Ithape
  • PublishedMarch 14, 2025

दरवर्षी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये बावधन येथे बगाड जत्रा भरवली जाते. एक ग्रामीण चालीरीतीचे सांस्कृतिक प्रतीक म्हणजे बगाड होय.याची निर्मिती कशी झाली.फार पूर्वीपासून बगडाची यात्रा भरली जाते.बावधन चा अर्थ म्हणजे विहीर(बावडी)आणि धनधान्य संपत्ती जिथे विहिरीच्या बाजूला शेती पिकवली जाते. यालाच बावधन असे नाव प्राप्त झाले. गावात ऐतिहासिक वारसा आहे. फाल्गुन महिन्याच्या होळी पौर्णिमेपासून रंगपंचमी पर्यंत यात्रा असते. ग्रामदैवत काळभैरवनाथ बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

काशिनाथाच्या नावानं चांगभलं म्हणून बगाड यात्रेची सुरुवात होत असते. या यात्रेला महाराष्ट्रातील व परराज्यातील लोक भक्ती भावाने हजेरी लावतात. आणि बगडाचा आनंद लुटतात. कृष्णा नदीवर सोमेश्वर मंदिरासमोर बगाडाची पूजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री उदयनराजे भोसले यांच्या हातून प्रत्येक वर्षी होत असते व बगाडाची सुरुवात होते.

बावधन गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा बगाड यात्रेची परंपरा चालूच होती. अनेक वर्षाकाळांपूर्वी एक सांस्कृतिक, धार्मिक प्रतीक म्हणून बगाड यात्रा भरवली जात असे. होळी पौर्णिमेच्या अगोदर लाकडी बाभळीची पूजा विधिपूर्वक करून झाड तोडले जाते. त्याचबरोबर उंच कळक बांबू तोडून ते बैलगाडीतून वाजत गाजत गावामध्ये मंदिरासमोर आणून पूजा केली जाते.
वर्षभर हेच लाकूड विहिरीमध्ये ठेवून पाण्यामध्ये रापवले जाते.कारण त्यातून बगाड्याचा कणा मजबूत बनवला जातो. बगडावर कोरीव काम केले जाते. आळ दांडी चंदनाच्या लाकडापासून बनवलेली असते. बगाड बनवत असताना कुठलाही लोखंडी भाग वापरला जात नाही.

बगाड्याची निवड ही मंदिरामध्ये वर्षभर नवस केलेल्या एका व्यक्तीची निवड देवाला कौल लावून केली जाते. मंदिरात पुजारी नाव निश्चित करून जाहीर करतो. मंदिरात बगाडयाची पूजा केली जाते. त्यातच त्याला दैवी मान मिळालेला असतो. याच दिवसापासून बगाड्या देवाचा उपास करत असतो. चतुर्थीला बगाड्याची गावभर मिरवणूक काढली जाते.

साधारण होळीपासून या यात्रेला सुरुवात होते. बगाडाचा मुख्य दिवस म्हणजे रंगपंचमी. या दिवशी सर्वांचे एक सारखे पांढरे शुभ्र पोशाख असतात व टोपी प्रत्येकाने परिधान केलेली असते. बगाड ओढण्यासाठी गावामध्ये बैल वर्षभर खुराक देऊन तयार केले जातात. खिलार जातीच्या बैलांची बगाड ओढण्यासाठी निवड केली जाते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा खुराक म्हणजे सरकी पेंड, ज्वारीचा कडबा, मारवेल गवत, मिक्स कडधान्य याचा रतीब बैलांना दिला जातो.

बावधन गावाला बारा वाड्यांची वस्ती आहे. साधारण साडेदहा हजार पेक्षा अधिक गावची लोकसंख्या आहे. अत्यंत कष्टाळू व मेहनती लोक या गावांमध्ये आहेत. वर्षभर शेती हा व्यवसाय करत असतात. बावधन गाव वाई तालुक्यांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावाला बागायत क्षेत्र भरपूर आहे. धोम धरनाचा कालवा, नागेवाडी धरणाचे पाणी शेतीसाठी पुरवठा होत असतो.

बगाडाचे वजन तीन टन असते. बगाडाला दगडाची चाकी असतात. त्यावर कण्याची रचना एक विशिष्ट पद्धतीची असते.याच बगाडाला तीस फूट उंचावर शिडावर बगाड्याला लटकवले जाते. नदीपासून ते भैरवाच्या मंदिरापर्यंत बगाड्याला लटकवलेले असते. कृष्णा नदीच्या सोमेश्वर मंदिरापासून बगाडाची सुरुवात होते. विधीपूर्वक देवाचे कृष्णा नदीमध्ये स्नान केले जाते. नंतरच देवाला बगाडावर पूजा करून सन्मानपूर्वक ठेवले जाते. नदीपासूनच बगडाची सुरुवात होते. बगाडाचा मार्ग हा 78 टक्के शेती मधूनच जात असतो. बैलांना कष्टदायक मातीतून बगाड ओढावे लागत असते. बगाड शेतातून जाणे म्हणजे भाग्य समजलं जातं. त्यामुळे कितीही शेतीचे नुकसान झाले तरी बगाड शेतामधून जावं ही प्रत्येकाची इच्छा असते.

दोनशे फूट बगाड पुढे गेले की नवीन बैल जोडा जुंपला जातो. शेतकरी ठरलेल्या ठिकाणी बैल घेऊन उभे असतात. प्रत्येकाला बगाड ओढण्याचा मान देतात. जे बगाड बैल ओढतात त्यां शेतकऱ्याला पुण्यवान समजले जाते.साधारण पाच लाख भाविक या यात्रेला बगाड पाहण्यास व दर्शन घेण्यास जमलेले असतात. काशिनाथाचं चांगभलं हा गजर सतत कानी पडत असतो. सगळे लोक सफेद कपडे आणि टोपी घातलेले असतात. संपूर्ण गुलालाचा खच पडलेला असतो. बगडावर वीस माणसे उभी राहिलेली असतात. नदीपासून साधारण ग्रामदैवत नऊ किलोमीटर अंतरावर आहे. शेवटी बगाड ओढत ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरासमोर आणून त्याची विधीपूर्वक पूजा करून समाप्ती केली जाते.

नंतर कुस्त्यांचा फड राज्यस्तरीय म्हणून आखाडा प्रसिद्ध आहे. बावधन गाव म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचे गाव. कै.ना.एन.एम.कांबळे मा. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कै. ना.मदन पिसाळ इत्यादी नेते महाराष्ट्राला दिले आहेत. याच गावची संस्कृती झी टीव्हीने मालिकेतून जगभर गावाला प्रसिद्धी दिली आहे. अशा महान बावधन गावास ऐतिहासिक वारसा, संस्कृती लाभली आहे. सांस्कृतिक वारसाचे जतन करणारे गाव म्हणजे बावधन. बारा महिने निसर्गसंपन्न असणाऱ्या गावाला विलोभनीय सौंदर्य लाभले आहे.

लेखक :- समाजसेवक, श्री तानाजी फणसे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!