वाचन संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी ग्रंथोत्सव उपयुक्त : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील.

वाई, ता.८:- वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता वाढते. चांगले संस्कार घडतात. परंतु आज २१ व्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे नव्या पिढीची वाचनाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी वाचन संस्कृतीचा आपला ठेवा जपण्याची खरी गरज आहे. त्यासाठी ग्रंथोत्सव, ग्रंथदिंडी, प्रदर्शन यासारखे उपक्रम उपयुक्त ठरतील, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी येथे व्यक्त केला.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथसंचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा व लो. टिळक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ ग्रंथोत्सव – २०२४ ‘ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर , विश्वस्त अनिल जोशी,जिल्हा ग्रंथालय अधिकारी
श्रीनिवास मंगलपल्ली यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन झाले.
श्री.पाटील म्हणाले, ऐतिहासिक सामाजिक परंपरा असलेल्या दक्षिणकाशी वाईने अनेकांचे जीवन समृद्ध केले असून साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात अनेकांनी शहराचा नावलौकिक वाढविला आहे. प्राज्ञ पाठशाळा मंडळ, विश्वकोश कार्यालय, ब्राह्मोसमाज, लो.टिळक ग्रंथालय ही वाईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची शक्तीपीठे आहेत. मराठी विश्वकोशाची निर्मिती आणि यशवंतराव चव्हाण आबासाहेब वीर यांना मार्गदर्शन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आचार – विचारांचे संस्कार या मातीत रुजले आहेत. या मातीत आपला जन्म झाला आणि विद्वानांची नगरी असलेल्या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची चारवेळा संधी मिळाली हे भाग्य समजतो. ग्रंथालय चळवळ गतिमान करून वाचन संस्कृती जपण्याचे काम करताना लो.टिळक स्मारक संस्थेने लोकहितवादी यांचा दृष्टिकोन सार्थ केला आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले यांची भाषणे झाली. संस्थेचे विश्वस्त अनिल जोशी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे,
सहकार्यवाह माया अभ्यंकर, सुनील शिंदे यांनी स्वागत केले. तनुजा इनामदार यांनी परिचय करून दिला. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी आभार मानले.
दरम्यान या ग्रंथोत्सवाची सुरुवात मराठी विश्वकोश कार्यालय येथून ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीचा प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक व मराठी विश्वकोशचे माजी विभाग संपादक श्री. एस. डी. इनामदार, किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी,
पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, लो.टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने झाला. या दिंडीत त.ल.जोशी विद्यालय आणि ज्ञानदीप इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी – विद्यार्थिनी वाचन चळवळीला गती देणाऱ्या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. या दिंडीत संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व अनेक ग्रंथप्रेमी सहभागी झाले. दिंडीचा समारोप लो.टिळक ग्रंथालय येथे झाला.
यावेळी ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन मकरंद पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक ग्रथपाल, ग्रंथालय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
मधल्या काळात वाईचे वैभव असलेले विश्वकोश कार्यालय अन्यत्र हलविण्याच्या विचार सुरू होता. त्यावेळी शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करून आपण सदर कार्यालय शहराबाहेर जाऊ दिले नाही. या कार्यालयासाठी नवीन जागेत सुसज्ज इमारत बांधण्याचा शासन निर्णय झाला असल्याची माहिती मकरंद पाटील यांनी दिली.
छायाचित्र ओळी:-
१) वाई:- जिल्हा ग्रंथोत्सव उद्घाटन प्रसंगी बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, त्यावेळी अनिल जोशी,
श्रीमती शालिनी इंगोले, दत्तात्रय मर्ढेकर ,
व श्रीनिवास मंगलपल्ली. छायाचित्र विनोद सोहनी, वाई.
२) वाई:- विश्वकोश कार्यालय येथे ग्रंथ दिंडीचा प्रारंभ करताना ज्येष्ठ साहित्यिक श्री एस. डी. इनामदार . त्यावेळी
श्रीमती शालिनी इंगोले, दत्तात्रय मर्ढेकर,
माया अभ्यंकर, अन्य मान्यवर )













