वसना नदीवरील नवीन पुलाच्या कामासाठी वडुथ-सातारा मार्ग नऊ महिने बंद; वाहतुकीत बदल
![]()
१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; वडुथ, किन्हई आणि कोरेगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित
सातारा : प्रतिनिधी l वडुथ-सातारा रोड-अंबवडे (सं.)-किन्हई या प्रमुख जिल्हा मार्गावरील वसना नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी वडुथ-सातारा रोड-अंबवडे (सं.)-किन्हई हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असून, या कालावधीत वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा पोलिसांनी पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित केले आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ अन्वये याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ३१ जुलै २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाहतुकीतील हे बदल लागू राहणार आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग
वडुथ येथून सातारा रोड व किन्हईकडे जाणारी वाहने वडुथ-भिमनगर फाटा-पाडळी-जळगाव-सातारा रोड-अंबवडे (सं.) मार्गे किन्हईकडे जातील. तर किन्हई व सातारा रोडवरून वडुथकडे येणाऱ्या वाहनांना किन्हई-सातारा रोड-जळगाव-पाडळी-भिमनगर फाटा या मार्गाने वडुथकडे यावे लागणार आहे.
वडुथ येथून कोरेगावकडे जाणारी वाहतूक वडुथ-भिमनगर फाटा-पाडळी-जळगाव मार्गे कोरेगावकडे वळविण्यात आली आहे. तसेच कोरेगावहून वडुथकडे येणाऱ्या वाहनांसाठी कोरेगाव-जळगाव-पाडळी-भिमनगर फाटा हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान, वसना नदीवरील जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०० मीटरपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहतूक वळविण्यात आलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
नऊ महिने या मार्गावरील वाहतुकीत बदल राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक अधिसूचनेचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.





















