Tue, Sep 29, 2026
सामाजिक

व्यसनांच्या विळख्यातून युवकांनी मुक्त व्हावे!

व्यसनांच्या विळख्यातून युवकांनी मुक्त व्हावे!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 23, 2026

किसन वीर महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत’ अभियान; युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे – भरत जाधव

वाई : प्रतिनिधी | दि. २२ सप्टेंबर २०२६

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील NCC युनिट व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या ऊर्जेचा उपयोग शिक्षण, क्रीडा, NCC, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी करावा, असे आवाहन सातारा पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे भरत जाधव यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भरत जाधव यांनी व्यसनांचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहल किंवा मित्रांच्या आग्रहातून होते; मात्र त्याचे परिणाम व्यक्तीच्या आरोग्यासह कुटुंब आणि समाजावरही गंभीर स्वरूपात होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी युवकांच्या सकारात्मक भूमिकेवर भर दिला. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या हातात देशाच्या प्रगतीची दिशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात निश्चित ध्येय ठेवून शिक्षण, क्रीडा आणि विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. व्यसनांपासून दूर राहणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कुटुंब व समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

“नशामुक्त भारताची सुरुवात प्रत्येक व्यक्तीपासून झाली पाहिजे. चांगली संगत, सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार करून युवकांनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे,” असे प्राचार्य डॉ. फगरे यांनी नमूद केले. NCC आणि क्रीडा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते. त्यामुळे अशा जनजागृतीपर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन NCC अधिकारी व क्रीडा संचालक मेजर डॉ. समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी NCC कॅडेट्स, खेळाडू, विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याची तसेच इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त, निरोगी, शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश पोहोचला.

कार्यक्रमाच्या शेवटी ज्युनिअर अंडर ऑफिसर सानिका सुळके यांनी आभार मानले. त्यांनी प्रमुख पाहुणे भरत जाधव, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, NCC अधिकारी मेजर डॉ. समीर पवार, प्रा. राहुल तायडे, प्रा. सुमित कोरडे, श्री. दत्ता काळे, शिक्षकवर्ग, NCC कॅडेट्स, खेळाडू तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचेही त्यांनी आभार मानले.

“व्यसनाला नकार — उज्ज्वल भविष्याला होकार; नशामुक्त युवक — सशक्त समाज — समर्थ भारत!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!