Sat, Sep 5, 2026
क्राईम न्यूज

एक नंबर प्लेट… ६० सीसीटीव्ही… अन् पोलिसांनी शोधून काढला संशयित!

एक नंबर प्लेट… ६० सीसीटीव्ही… अन् पोलिसांनी शोधून काढला संशयित!
Ashok Ithape
  • PublishedAugust 28, 2026

सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाची थरारक शोधमोहीम; महिलांच्या सुरक्षेला धोका ठरण्यापूर्वीच कारवाई

सातारा, दि. २५ : पवई नाका परिसरातील एका घटनेची तक्रार सातारा शहर पोलिसांकडे दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संशयिताचा चेहरा स्पष्ट नसल्याने आणि ओळख पटत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि मोटारसायकलच्या अर्धवट नंबर प्लेटचा धागा पकडत पोलिसांनी तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा माग काढत संशयिताला सैदापूर येथून ताब्यात घेतले.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी पवई नाका परिसरापासून संशयिताच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. एक-दोन नव्हे, तर तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी बारकाईने तपासले.

संशयित ज्या दिशेने गेला, त्या मार्गावरील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी त्याच्या हालचालींचा क्रम जोडला. याच तपासादरम्यान संशयिताच्या मोटारसायकलची अर्धवट नंबर प्लेट पोलिसांच्या हाती लागली. हा महत्त्वाचा धागा ठरला.

पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनाची माहिती मिळवली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताच्या हालचालींचा माग शहराबाहेरपर्यंत घेण्यात आला. अखेर हा माग सैदापूर येथे पोहोचला.

सैदापूर येथे चौकशी केली असता संशयिताची ओळख विनोद मोहन कामटे (वय ४०, रा. सैदापूर, जि. सातारा; मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी निष्पन्न झाली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमातील कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता संशयिताचा वेळेत शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. ६० सीसीटीव्ही फुटेज, अर्धवट नंबर प्लेट आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे केलेली ही कारवाई सातारा शहर पोलिसांच्या तपास कौशल्याचे उदाहरण ठरली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

महिला व मुलींनी कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा कोणी पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. पालकांनीही मुलांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणताही विलंब न करता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!