Tue, Jul 21, 2026
क्रीडा

चीनमध्ये प्राची देवकरची ऐतिहासिक कांस्य झेप; कराडच्या लेकीने भारताचा झेंडा उंचावला

चीनमध्ये प्राची देवकरची ऐतिहासिक कांस्य झेप; कराडच्या लेकीने भारताचा झेंडा उंचावला
Ashok Ithape
  • PublishedJuly 14, 2026

कराड : चीन येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या प्राची अंकुश देवकर हिने ३००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत १० मिनिटे ३२ सेकंदांची वेळ नोंदवत भारतासाठी कांस्यपदक पटकावले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्राची गेल्या अकरा वर्षांपासून कराड येथील हिरकणी सामाजिक क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. तिच्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.
यापूर्वीही प्राचीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी सात ते आठ पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच भारताचे प्रतिनिधित्व करताना चीनमधील जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धा आणि दक्षिण आशियाई स्पर्धांमध्येही पदके मिळवत देशाचा गौरव वाढविला आहे.

मर्यादित सुविधा आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार यश संपादन करता येते, हे प्राचीने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. आशियाई स्पर्धेतील हे कांस्यपदक तिच्या कारकिर्दीतील आणखी एक मानाचा अध्याय ठरला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्राची देवकर आणि तिचे प्रशिक्षक अतुल पाटील यांचे हिरकणी सामाजिक क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सलीमभाई मुजावर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, संस्थेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!