Fri, Apr 17, 2026
सातारा जिल्हा

धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

धरणांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवा – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedApril 17, 2026

सातारा : एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल त्या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच जिल्ह्यातील धरणांमधील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह सर्व प्रांत व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या गावासाठी किंवा वाडी वस्त्यांसाठी टँकरची मागणी आल्यास तात्काळ संबंधित गावाला भेट देऊन टँकर सुरु करावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे हात पंप बंद पडले आहे त्या तातडीने दुरुस्त करावे. ज्या ठिकाणी विधंन विहिरीची गरज आहे अशा ठिकाणी नव्याने विधंन विहिरी घ्याव्यात तसेच दुरुस्तीचे कामे हाती घ्यावेत. टंचाई काळात शेतकऱ्यांचे देयकाअभावी विज कनेक्शन तोडू नये. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल या पद्धतीने पाणी साठवून ठेवावे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्तक राहून कामे करावीत.ज्या ठिकाणी विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!