मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम
![]()
३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त वसुलीचा निर्धार; जिल्हा परिषद सीईओंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कारवाई तीव्र
वाई : वाई तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत सशक्तीकरण विभागाच्या वतीने वसुली मोहिमेला वेग देण्यात आला असून, तालुक्यातील ग्रामपंचायतींनी थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वसुलीसाठी स्वतंत्र गुणांकन पद्धती लागू करण्यात आली असून, एकूण सहा गुण वसुलीवर आधारित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जास्तीत जास्त वसुली करण्यावर भर दिला जात आहे.
तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायती या अभियानात सक्रियपणे सहभागी झाल्या असून, सर्वच ग्रामपंचायतींमध्ये वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यापैकी तीन ते चार ग्रामपंचायतींनी शंभर टक्के वसुली पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे.
ओझर्डे ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गावामध्ये मागील सहा ते सात वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टी व इतर करांच्या वसुलीसाठी थेट नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रशासनाने हा कडक निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त वसुली पूर्ण व्हावी आणि तालुका तसेच जिल्हा स्तरावर अभियान यशस्वी व्हावे, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी राहुल हजारे, रूपेश मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, शरद गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी रत्नाकर गायकवाड, प्रशांत धुमाळ, किरण पिसाळ, अतुल डेरे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, वसुलीला मोठ्या प्रमाणात गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













