प्रामाणिकपणाचा आदर्श : रस्त्यावर सापडलेले ४० हजार रुपये मालकाला परत
![]()
वाघोलीच्या विशाल भोईटे यांचा वाठार पोलिसांकडून सत्कार; सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेऊन ओमकार बोबडे यांना पैसे परत
भुईंज l प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळात प्रामाणिकपणाचे उदाहरण कमीच पाहायला मिळते. मात्र वाघोली (ता. कोरेगाव) येथील युवक विशाल शिवाजी भोईटे यांनी रस्त्यावर सापडलेले चाळीस हजार रुपये योग्य मालकाचा शोध घेऊन परत करत प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार नंदकुमार बोबडे (रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे अनपटवाडी येथून वाघोली येथील बँकेत जात होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील पाचशे रुपयांच्या नोटांचे चाळीस हजार रुपये असलेले बंडल मोटरसायकलवरून खाली रस्त्यावर पडले. मात्र त्यांना त्याची कल्पना न आल्याने ते पुढे पिंपोडेकडे निघून गेले.
दरम्यान, वाघोली येथील विशाल भोईटे हे आपल्या भाच्याला शाळेत सोडण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर हे पैसे सापडले. त्यांनी तात्काळ परिसरात चौकशी केली; परंतु पैसे नेमके कोणाचे आहेत हे समजू शकले नाही. त्यानंतर त्यांनी समोर असलेल्या वैष्णवी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतले. त्या फुटेजमधून हे पैसे कोणाच्या खिशातून पडले याचा अंदाज घेत त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू ठेवला.
काही वेळाने ओमकार बोबडे तेथून परत जात असताना विशाल भोईटे यांनी त्यांना थांबवून विचारणा केली. त्यावेळी हे पैसे त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही बोबडे यांच्या खिशातून पैसे पडताना दिसून आले. यानंतर विशाल भोईटे व त्यांच्या मित्रांनी वाठार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले तसेच एएसआय जितेंद्र शिंदे व आनंदराव भोसले यांना दिली. चौकशी व खात्री केल्यानंतर ओमकार बोबडे यांना त्यांचे चाळीस हजार रुपये परत देण्यात आले.
यावेळी विशाल भोईटे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे आणि मनाच्या मोठेपणाचे कौतुक करत वाठार पोलीस स्टेशनतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भोईटे, पंकज भोईटे, शंभूराज भोईटे, सुधीर भोईटे, विकास भोईटे तसेच वाघोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
वडिलांच्या पावलावर पाऊल – वाघोली येथील विशाल भोईटे हे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भोईटे यांचे चिरंजीव असून त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा वडिलांच्या सामाजिक कार्याचीच परंपरा पुढे नेणारा असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी सांगितले. त्यांच्या या आदर्शवत कृतीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
फोटो ओळी : ओमकार बोबडे यांचे रस्त्यावर पडलेले ४० हजार रुपये परत देताना व विशाल भोईटे यांचा सन्मान करताना स.पो.नि. सुशिल भोसले, एएसआय जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, शिवाजीराव भोईटे आदी.













