Fri, Apr 17, 2026
साहित्य

लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या अकराव्या पुष्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंडस्ट्री 4.0 या विषयावर मार्गदर्शन

लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या अकराव्या पुष्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंडस्ट्री 4.0 या विषयावर मार्गदर्शन
Ashok Ithape
  • PublishedMay 13, 2024

वाई, ता.१२ः कृत्रिम बुद्धिमत्ता आज सर्व परिचित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक क्षेत्रात धोका निर्माण झाला आहे अशी समजूत असते. ती काही प्रमाणात खरी देखील आहे. इंडस्ट्री 4.0 अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जग प्रचंड वेगाने बदलत आहे. या बरोबरच आपणही बदलणे गरजेचे आहे. कारण जो बदलेल तोच उद्या टिकेल असे विवेचन प्रसिद्ध संशोधक श्री भूषण केळकर यांनी आपल्या व्याख्याना द्वारे केले. लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या अकराव्या पुष्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंडस्ट्री 4.0 या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी श्री मदनकुमार साळवेकर हे अध्यक्षस्थानी होते.

भूषण केळकर म्हणाले, “तुमच्या चेहऱ्यावरून तुमचा राजकीय पक्ष ओळखणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आता चायनामध्ये आले आहे. यावरूनच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्याप्तीची कल्पना आपल्याला येते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चौथ्या औद्योगिक क्रांती मधून आपण व आपली पुढची पिढी कदापी सुटणार नाही.
कला शाखेतून शिक्षण घेणाऱ्यासमोर दोन व्यावसायिक पर्याय असतात. पहिला म्हणजे कॉन्टेन्ट क्रिएशन अर्थात नाटकाची संहिता लिहिणे, चित्रपटाचे अथवा मालिकांचे संवाद असे तत्सम कार्य आणि दुसरा म्हणजे अनुवाद-भाषांतर असे कार्य. मात्र आज चॅट जीपीटी सारखा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार ही कामे सहज करतो. त्यामुळे निश्चितच या कामाशी निगडित नोकऱ्या पुढील पाच ते दहा वर्षात धोक्यात येणार आहेत.मात्र आजच्या विद्यार्थ्यांना याची जाणीव नाही.

इंडस्ट्री 4.0 म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती. १७८४ मध्ये वाफेच्या इंजिनमुळे पहिली औद्योगिक क्रांती अर्थात इंडस्ट्री 1.0 झाली. १८७० मध्ये विजेच्या शोधामुळे दुसरी औद्योगिक क्रांती म्हणजेच इंडस्ट्री 2.0 झाली. १९६९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या शोधामुळे तिसरी औद्योगिक क्रांती इंडस्ट्री 3.0 झाली. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आहे.ही इंडस्ट्री 4.0 कोणत्याही एका तंत्रज्ञानामुळे न होता ही अनेकविध तंत्रज्ञानाचा समुच्चय असणार आहे. मग यापूर्वी तीन वेळा औद्योगिक क्रांती झालेली असताना या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे धोका निर्माण का व्हावा? याचे उत्तर आहे तांत्रिक क्रांती यापूर्वी देखील होत होती. मात्र ही क्रांती समजून व अवगत करून घ्यायला पुरेसा वेळ उपलब्ध होता.

चौथी औद्योगिक क्रांती ज्या वेगाने होत आहे त्या वेगाने ती अवगत करून स्वतःला त्यात पारंगत करणे व नवीन व्यावसायिक संधी स्वतःसाठी निर्माण करणे अवघड काम आहे.यासाठी प्रवाहपतीत न राहता सावध व व्यवसायाभिमुख होणे गरजेचे आहे. चौथी औद्योगिक क्रांती आपल्या समाज व्यवस्थेचा एक भाग झालेली आहे.

कॉल सेंटरवर आधारित असणाऱ्या नोकऱ्या लवकरच जाणार असे वक्तव्य एका कंपनीने केले. एवढेच काय तर कोडींग मध्ये स्वतःचे भविष्य पाहणारे विज्ञान शाखेचे विद्यार्थी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.पुढच्या काही वर्षात
A I द्वारे कोडींग सुद्धा करण्यात येईल असे म्हटले जात आहे. मग आपले स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक टूरमने असे वर्तवले आहे की 2025 मध्ये ८६ दशलक्ष नोकऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जातील. मात्र ९७ दशलक्ष नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

आपले काम असे आहे की ज्या नोकरीच्या नवीन संभावना निर्माण होणार आहेत त्यांचा अभ्यास करून आपण त्या अवगत करून घेणे व ज्या नष्ट होण्याची शक्यता आहे त्यात आपले करिअर करण्याचा सायास सोडून देणे.

पूर्वी आकाशातून जमिनीवरचा शॉट अथवा फोटो घ्यायचा असेल तर पायलट आणि कॅमेरामन यांची गरज भासायची. मात्र आज ड्रोन या तंत्रज्ञानामुळे या दोन्ही नोकरी गेल्या. मात्र ड्रोन मॅन्युफॅक्चर करणारा, तो हाताळणारा व त्यातून आलेला फोटो अथवा शॉट तपासणारा अशा तीन माणसांसाठी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. याचाच अर्थ कृत्रिम बुद्धिमत्तेशी आपली स्पर्धा नाही कृत्रिम बुद्धिमत्ता चालवणाऱ्या लोकांबरोबर आपली स्पर्धा आहे.
येणाऱ्या काळात आपले भवितव्य, आपले करिअर सुरक्षित करण्यासाठी काही गोष्टी आवश्य करा.

विश्लेषणाकडून संश्लेषणाच्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करा. IQ ऐवजी EQ व AQ वर भर द्या. पाठांतराऐवजी सूक्ष्म शिक्षणावर भर द्या. निदान दोन क्षेत्रातील, विषयातील शिक्षण घ्या. नवीन भाषा अवगत करा.”

भूषण केळकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे भवितव्यात येणाऱ्या व्यावसायिक संधी व त्या दृष्टीने प्रयत्न यांसंदर्भात अत्यंत ज्ञानप्रद मार्गदर्शन केले. श्री मदनकुमार साळवेकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

कै. दत्तात्रय मेणबुधले यांचे स्मृत्यर्थ डॉ. महेश मेणबुधले तसेच डॉ.श्री. अमर अरविंद कित्तुरकर यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केले होते. यावेळी डॉ सौ मधुरा केळकर, डॉ अमेय पांगारकर,माधवी नाडकर्णी यांचेसह कार्यक्रमास वाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!