औंधमध्ये कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार, एक लाखाची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी रंगेहाथ ताब्यात
सातारा / प्रतिनिधी :
खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व सहायक उपनिरीक्षक यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून कुंपणानेच शेत खाण्याच्या या प्रकाराची सर्वत्र उलट सुलट चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यांमध्ये संबंधित तक्रारदारास मदत करण्यासाठी व त्याच्या व्यवसायात इथून पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी, बेकायदा कृत्यांना संरक्षण देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारून तक्रारदारास सहकार्य करण्याचे निश्चित झाले. मात्र पोलिसांना लाच देणे व आपले काम साध्य करणे योग्य वाटत नसल्याने दरम्यान तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व त्यानुसार सापळा रचण्यात आला. त्यामध्ये औंध बाजार पटांगणातील जुना एसटी स्टँड परिसर येथे आरोपी लोकसेवक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यावतीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव यांनी तक्रारदारांकडून एक लाख रुपयांची रक्कम लाच स्वरूपात स्वीकारली.
संबंधित लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा पथकातील पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य, पोलीस कर्मचारी निलेश चव्हाण, तुषार भोसले, निलेश येवले या सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिनिधींनी आरोपींना रंगेहात पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ज्यांनी समाजाला शिस्त लावावी आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी शांतता व सुव्यवस्था राखावी अशा पोलीस अधिकाऱ्यांनीच लाच स्वीकारणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया जाणकारातून व्यक्त होत आहे.
दरम्यान लोकसेवक असणारे कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी नियमानुसार होत असणारे शासकीय काम करण्यासाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असतील तर 98 23 23 12 44 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे.













