लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.चिंतामणी केळकर यांनी निवड.
वाई,ता. ३:- येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. चिंतामणी केळकर यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंतनु अभ्यंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदाच्या निवडीसाठी नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांच्या अध्यक्षते खाली संस्थेच्या विश्वस्त व कार्यकारी मंडळाची संयुक्त सभा झाली. या सभेत अध्यक्षपदी डॉ. केळकर यांचे नाव दत्ता मर्ढेकर यांनी सुचविले व सौ तनुजा इनामदार यांनी अनुमोदन दिले तदनंतर सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच रिक्त झालेल्या संचालक पदावर डॉ. अभ्यंकर यांच्या पत्नी डॉ. रूपाली अभ्यंकर यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष डॉ.केळकर हे प्रसिद्ध नेत्रतज्ञ असून जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय भिमकुंडआळी कृष्णाबाई संस्थान, इंडीयन मेडिकल असोसिएशन वाई शाखा, रोटरी क्लबचे सक्रिय सदस्य आहेत. केळकर यांनी मागील वर्षी वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथसंग्रहालय, वसंत व्याख्यानमाला, पंचक्रोशी साहित्य संमेलन, कवी संमेलन व विविध सांस्कृतिक उपक्रमातून सर्वांच्या सहकार्यातून वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही डॉ. केळकर यांनी यावेळी दिली. तर डॉ. रूपाली अभ्यंकर यादेखील प्रसिद्ध नेत्रतज्ञ असून रोटरी क्लब, आय.एम.ए. वाई शाखा , प्रतिक
थिएटर्स या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
सभेत प्रारंभी डॉ. अभ्यंकर यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी विश्वस्त अनिल जोशी, सुनिल शिंदे, ॲड. श्रीनिवास कुलकर्णी, कार्यकारी मंडळातील सदस्य विवेक पटवर्धन, आनंद शेलार, भालचंद्र मोने, श्रीनिवास खरे , शिवाजी कदम, आदित्य चौंडे, सौ. स्मिता कान्हेरे, सौ.तनुजा इनामदार, श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, ग्रंथपाल अमित वाडकर आदी उपस्थित होते. कार्यवाह भद्रेश भाटे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सहकार्यवाह सौ. माया अभ्यंकर यांनी आभार मानले.













