सातारा हिल मॅरेथॉन संपूर्ण जगात वैशिष्ट्यपूर्ण, शुभारंभ प्रसंगी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे प्रतिपादन
![]()
सेकंदांच्या फरकांनी ठरले मॅरेथॉनचे विजेते, मोठ्या चुरशीने धावले पुरुष आणि महिला गटातील धावपटू
अभूतपूर्व उत्साहात आज संपन्न झालेल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांनी पार पडलेले अंतर अगदी काही सेकंदांच्या फरकांचे असून महिला व पुरुष गटातील या चुरशीच्या लढती हे आजच्या मॅरेथॉनचे खास वैशिष्ट्य ठरले.

सातारा / प्रतिनिधी-
सातारा हील मॅरेथॉन ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन आहे. साधारण 13 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे, याचा आनंद वाटतोय, असे प्रतिपादन खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे आयोजित सलग तेराव्या वर्षाच्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस परेड ग्राउंड वर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा रनर्स फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व देशभरातून आलेल्या धावपटूंची उपस्थिती होती.
यावेळी उदयनराजे म्हणाले की, कास हे पूर्वीपासूनचे माझे आवडते ठिकाण आहे. मी नेहमीच घाटाई मंदिर, कास परिसरात जातो. एकदा डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांच्या समवेत त्या मार्गावरून जात असताना सातारकरांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि त्यांना व्यायामाची आवड लागावी यासाठी काहीतरी ठोस उपक्रम घेऊया, अशी चर्चा झाली आणि त्यातूनच सातारा हाफ हिल मॅरेथॉनचा जन्म झाला. निरोगी शरीर हीच प्रत्येकाची खरी संपदा असते आणि ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा ठरतो. सातारा हाफ हील मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेकांना व्यायामाची आणि धावण्याची सवय लागली, तसेच या स्पर्धेत स्थानिक आणि राज्यभरातून, देशभरातून इतकेच काय परदेशातूनही धावपटू येतात हे या स्पर्धेचे अनोखे यश आहे.

भविष्यात ही मॅरेथॉन संपूर्ण जगभरात नावलौकिक कमवेल, असा मला विश्वास आहे. धावपटूंना मॅरेथॉनमुळे जशी ऊर्जा मिळते तसेच अशा उपक्रमामुळे संपूर्ण समाजाला गती आणि ऊर्जा मिळते. रनर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच सातारकर नागरिक, प्रायोजक या सर्वांच्या अथक परिश्रमातून होत असलेल्या सातारा मॅरेथॉनचे नाव जगभर व्हावे, अशी माझी सदिच्छा आहे.
साताऱ्याची मॅरेथॉन सातासमुद्रापार
गेल्या १३ वर्षापासून सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा चांगल्या रितीने पार पाडत असल्याबद्दल खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी संयोजकांचे कौतूक केले. स्पर्धेसाठी चांगले वातावरण असल्याने स्पर्धक मनापासून सहभाग घेत आहेत. साताऱ्याची मॅरेंथॉन सातासमुद्रापार गेल्याने साताऱ्याच्या पर्यटन व्यवसायासाठी वाढ झाली आहे. ही स्पर्धा उत्तमोत्तम होत राहो अशी सदीच्छाही देण्यात आली.
मॅरेथॉनची व्यापकता वाढतेय
सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाल्यानंतर सातारकरामध्ये हळूहळू धावण्याबाबत जनजागृती होत आहे. त्याचा दरवर्षी वेगवेगळा अनुभव येत असून धावणाऱ्यांची संख्येत २ हजाराहून आठ हजारावर गेली आहे. फक्त सामान्य नागरिक नव्हे तर वृध्दही या स्पर्धेचा आनंद लुटताना दिसत आहेत. अगदी ९० वर्षे असणाऱ्या वृध्दांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अगामी काळात यामध्ये आणखी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्पर्धेने अल्पावधीतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे.मॅरेथॉनची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.
चौका चौकात ढोल ताशाचा निनाद
सातारा हिल मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर धावणाऱ्याना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा मार्गावर चौकाचौकात ढोल ताशा पथक, झांज पथकांचा निनाद सुरू होता. त्यामुळे स्पर्धकांमध्ये धावताना एक प्रकारचा जोश निर्माण होत होता. तसेच ठिकठिकाणी धावपटूंच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले.
मॅरेथॉन मार्ग घोषणांनी दणाणला
सातारा हिल मॅरेथॉनच्या मार्गावर जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, चक दे इंडिया, भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा विविध घोषणा देत सातारवासियांनी मॅरेथॉनमधील सहभागीचा उत्साह वाढवला.या घोषणांना घोषणांच्या रूपाने साद देत धावपटूंनीही विविध घोषणा दिल्याने राजधानी साताऱ्याचा परिसर दणाणून गेला. काही धावपटूंनी तिरंगा ध्वज हातात घेवून दौड केली.
पांरपारिक वेशभुषेचे आकर्षण
मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटू पांरपांरिक वेशभुषा करून सहभागी झाले होते. यात काहींनी शेतकरी, मावळे, वारकरी वेशभुषा परिधान केली होती. तर महिलांनी महाराष्ट्रीयन संस्कृती जपत नववारी साड्या परिधान करून सहभाग नोंदवला. त्याचबरोबर मरेथॉन आयोजकांनी धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी कास रोडवरील यु टर्न पाईंट व मॅरेथॉन सुरू होणाऱ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मॅरेंथॉनमध्ये विविध वेशभुषा साकारून सहभागी झालेले धावपटू मॅरेथॉनचे आकर्षण ठरले.
देश विदेशातील धावपट्टूंची उपस्थिती लक्षवेधक
आंतरराष्ट्रीय धावपट्टू व विविध खेळात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या काही धावपटूंची उपस्थिती लक्षवेधक ठरली. मान्यवर धावपटूंनी सहभागी स्पर्धकांना यशस्वी होण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या.त्याचबरोबर मॅरेथॉनच्या ठिकाणी लक्षणीय उपस्थिती दर्शवलेल्या बाल चमुंशी संवाद साधत त्यांना टाळ्या देत त्यांचा उत्साहही या धावपटूंनी द्विगुणीत केला.
मॅरेथॉन मार्गावर आरोग्य यंत्रणा अलर्ट
मॅरेथॉन मार्ग एकूण २१ किलोमीटरचा होता या मार्गावर संयोजकांकडून ८ ठिकाणी आरोग्य यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर्स, सुसज्ज अशी रूग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. त्यांच्या मदतीला मेडिकल स्टॉफ देण्यात आला होता. काही धावपटूंना त्रास झाल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. तसेच पोलिस कवायत मैदानावर सुसज्ज असे हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली होती त्याठिकाणीही धावपटूवर किरकोळ उपचार करण्यात आले.
प्रत्येकावर जबाबदारी
सातारा रनर्स फाऊंडेंशनच्या माध्यमातून सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामुळे प्रत्येक सदस्यावर मॅरेथॉनची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे जो तो सदस्य आपली जबाबदारी कटाक्षाने पार पाडत होता त्यांना अन्य सदस्यही मदत करताना दिसत होते.
झुंबा डान्सवर धावपटू थिरकले
मॅरेथॉनच्या संयोजकांनी धावपटूंना उत्साह देण्यासाठी झुंबा डान्सच आयोजन करण्यात आले होते. मुंबई शायनाज सुपर स्कॉडची टिमने झुंबा डान्स सादर केला. यावेळी मॅरेथॉन पुर्ण करून आलेल्या धावपटूंनी व उपस्थितांनी या झुंबा डान्सवर चांगलाच ताल धरला होता.अनेक जण बेभानपणे नाचताना दिसत होते काही महिला धावपटू या स्टेजवर जावून डान्स करताना दिसल्या.













