अपर पोलीस अधीक्षक श्री. महेश तरडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान.
![]()
जावली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
भुईंज l महेंद्रआबा जाधवराव
पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील श्री. महेश मोहनराव तरडे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आले आहे.
संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी “गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान केले जाते. वर्ष २०२४ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील एकुण ९०८ पोलीसांना पोलीस पदके जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५९ पोलीसांचा समावेश आहे.
मुळचे बामणोली ता.जावली जि.सातारा येथील असलेले सहायक पोलीस आयुक्त श्री. महेश मोहनराव तरडे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
श्री. महेश तरडे हे सन १९९२ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवुन पोलीस उपनिरीक्षक पदावर भरती झाले. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर, भिवंडी, गुन्हे शाखा उल्हासनगर येथे त्याव्यतिरिक्त मुंबई येथे सुरक्षा शाखा, नवी मुंबई येथे कळंबोली, तळोजा व मिरारोड येथे काशिमीरा, व सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असतांना उत्कृष्ट कामाने लौकिक मिळविला आहे.
त्यांचे एकुण ३२ वर्षाच्या सेवाकालावधीत कल्याण येथील दिपक शेटटी हत्याकांड, उल्हासनगर येथील शिवसेना कार्यकर्ते गोपाल रजवानी हत्याकांड, अंबरनाथ येथील नगरसेवक प्रसन्न कुलकर्णी हत्याकांड, डोंबिवली येथील केबल व्यावसायिक अनंतपालन हत्याकांड व मुंबई येथील हिरे व्यापारी अश्रफ पटेल हत्याकांड व अशा इतर अनेक गुन्हयातील आरोपींना शस्त्रासह अटक करुन क्लिष्ट गुन्हे उघडकिस आणले आहेत खंडणीविरोधी पथकात कार्यरत असतांना सुरेश मंचेकर, छोटा राजन, शेटटी तसेच इतर गैंगस्टरांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईत ११ जणांना यमसदनी धाडण्यात त्यांचा डॅशिंग सहभाग होता. विविध गॅगच्या ७० खतरनाक गुन्हेगांराना खंडणी घेतांना पकडले. तसेच विविध टोळीचे गुन्हेगारांकडुन देशी-विदेशी बनावटी ७४ शस्त्रे हस्तगत केली आहेत. पोलीस खात्याच्या या कामगिरीमुळे कल्याण, डोंबिवली ठाणे येथील बिल्डर लॉबी डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यांना ३२ वर्षातील उत्कृष्ट सेवेसाठी ५७८ बक्षीसे व प्रशस्तीपत्रे मिळालेली असुन वरील प्रमाणे केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना सन २०१५ मध्ये “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे.













