चिंधवलीत शेवाळे सरांच्या उल्लेखनीय वाटचालीला शुभेच्छांतून मिळाले भरभरून प्रेम
![]()
७० व्या वाढदिवसानिमित्त नवलाई जेष्ठ संघाने केला विशेष सन्मान..
चिंधवली l प्रतिनिधी:
सात दशकांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन यशस्वी केलेली वाटचाल, ज्ञानदानातून अनेक विद्यार्थी घडविले, अनेकांच्या पाठीवर दिलेली ज्ञानदानाची भविष्यमय शिदोरी आजही कित्येकांना उर्जावान तर आहेच पण त्याहीपुढे शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास सुंदरच अगदी कोऱ्या कागदावर सप्तरंग उमटावेत आणि त्यातून बोलकी निर्मळ परिभाषा निर्माण व्हावी ती तितकीच सुंदर…
२ जुलै १९५४ सालचा जन्मदिवस असलेले श्री सुर्यकांत नारायण शेवाळे सर (आप्पा) हे विज्ञान शाखेच्या पदवी बरोबर शैक्षणिक पदवी घेणारे चिंधवली गावातील दुसरे व्यक्तिमत्व.
रयत शिक्षण संस्थेमध्ये आपले अमूल्य योगदान देत असताना शैक्षणिक भरिव कामगिरीमुळे शिक्षक ते मुख्याध्यापक या टप्प्यावर त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या दोन्ही मुली मुंबई येथे शिक्षण क्षेत्रात काम करत असून चिरंजीव नोकरी, व्यावसायात स्थिर स्थावर आहेत.
सेवा निवृत्तीनंतर चिंधवली नवलाई जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य असून आजही त्यांच्या अनुभवातून, विचारांतून, ज्ञानातून अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
आज आप्पांनी ७१ व्या वर्षात पदार्पण केले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिंधवली विकास सेवा सोसायटी येथे नवलाई जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने, तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, चिंधवली ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग यांच्या वतीने त्यांच्या आनंददायी वाढदिवसाच्या वाटचालीला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी त्यांच्या समवेत संपूर्ण शेवाळे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.













