Mon, Mar 2, 2026
शिक्षण

चार दशकानंतर शिवाजी विद्यालय सुरूर येथे रंगला स्नेहमेळावा.

चार दशकानंतर शिवाजी विद्यालय सुरूर येथे रंगला स्नेहमेळावा.
Ashok Ithape
  • PublishedJune 23, 2024

आठवणींना उजाळा देत अनाथ आश्रमाला दिला मदतीचा हात.

चिंधवली l दिपक पवार

जन्म आणि मृत्यू या मधील अंतर म्हणजे जीवन…
जन्मापासून उघडलेले डोळे आणि आई वडिलांच्या मातृत्वातून अविरत सेवेतून उजाडणारी प्रत्येक सुंदर सकाळ आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असते.

कधी सुखावणारी तर कधी दु:खावणारी वाटचाल हेच आपल्याला आनंदही आणि दुःखही देत असते त्याच सुखदुःखावर मलम लावून आपल्याला उभं राहायला सावरायला आणि जगायला शिकवणारी शाळा, कॉलेज…

इथून तिथून निघून आपण जेव्हा तिच्या प्रांगणात येतो तेव्हा उद्याच भविष्य आपल्यासाठी काय लिहून ठेवलंय हे कदाचित आपल्याला माहीत नसते, फक्त आई-वडिलांच्या गुरुजनांच्या विश्वासातून ज्ञानार्जनाच्या अमूल्य भेटीतून मिळालेली शिदोरी पाठीवर घ्यायची आणि मिळालेल्या वाटा चोखाळत पुढे जायचं आणि सोनेरी सप्तरंगी आयुष्य फुलवायच एवढंच डोक्यात..

काळ लोटला, वर्ष गेली, वय वाढलं आपल्या मागे नव्या पिढ्या उदयास आल्या पण आठवणी कधीच मरत नाहीत तर त्या कायमच जिवंत राहतात, त्या आठवणी प्रेरणा देतात, उर्जा देतात, जिंकवतात, शिकवतात त्याचे खरे महामेरू आदरणीय आई वडील आणि शिक्षक वृंद..

कधी न कधी कोणाच्या गाठीभेटी होत असतात, त्यातून आठवणींचा कप्पा अलगद उचकटला की सगळं कसं ताजेतवाने बाहेर पडत मग कधी भावनिक, तर कधी अर्थपूर्ण एकमेकांबद्दल विचारपूस, त्यातून कानी पडलेले सुखदुःखाचे झरोके स्तब्ध करतात आणि विचार करायला लावतात की आपलं आयुष्य राहिलयं किती…?
असेच दिवस संपून जातील, काळ लोटला जाईल, पिढ्या न पिढ्या संपल्या जातील पण कधीतरी मागे डोकावून पाहिले तर त्या पाऊलवाटा नक्कीच आठवणीं गाठोडी सोडावीत तसं उचकटत जातात म्हणूनच
तब्बल ४० वर्षांनी म्हणजे सन १९८४-८५ इयत्ता दहावीच्या वर्गात शिकलो, वाढलो आणि भरारी घेणारे पंख आले आणि जे सर्वजण दाही दिशा भरकटलो ते आम्ही आवर्जून शिवाजी विद्यालय सुरूर येथे एकत्र आलो.

चेहरे तेच होते पण जबाबदारीच्या आणि उज्वल भविष्यासाठी कष्ट घेताना पिचलेले होते, आवाज तोच होता पण त्यामध्ये कणखरपणा होता, नजर तीच होती पण त्यामध्ये दूरदृष्टी होती, मैत्री तीच होती पण त्यामध्ये विश्वास होता, धांदरटपणा तोच होता पण त्यामध्ये शिस्त होती, चेष्टा मस्करी होती पण त्यामध्ये आपलेपणा होता, सगळेच होते पण वयाने वाढलेले होते… आभाळ दाटून यावे तसे क्षणभर शांत होतो पण आठवणींनी धो धो बरसत होतो… अगदी बेधुंद.

सहा सात जिल्ह्यातील आम्ही पंचेचाळीस जण एकत्र आलो, पोटभरून केलेल्या नाश्त्यामुळे मन विचलित होण्याचं कारण नव्हतं,
आमचा स्नेहमेळावा स्नेह वाढवा इतकाच प्रगल्भ होताना गुरुजनांनी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून चार दशकांनंतर भरलेला वर्ग का कोणास ठाऊक थोडा वेगळाच वाटला, तिथ भिती नव्हती, ना कोणत दडपण पण भरून आलेलं मन होतं…
वंदना देशमुख आणि रेहाना मोकाशी यांनी सूत्रसंचालन वाढवलेला उत्साह, दुःखद आठवणींनी निशब्द होताना दाटून आलेले कंठ..क्षणभर सावरताना गुरुजनांचा केलेला यथोचित सन्मान.

संगीता चव्हाण, छाया चव्हाण, रेहाना मोकाशी, शुभांगी पोळ, हिंदुराव चव्हाण, राजेश गवते, छायेंद्र मोरे, नाना देवकर, वंदना देशमुख, संतोष शिंदे, संजय शिंदे, दिपक रणपिसे, अनिल आवाडे, राजेंद्र भागवत यांनी शाळेतील गमती जमतीवर फिरवलेला भवरा गालावर खळी निर्माण करून गेला.
श्री सावंत सर, श्री चौगुले सर, श्री यादव सर, श्री माधवराव डेरे सर, श्री पारखे सर, श्री चव्हाण सर, श्री आनंदराव डेरे सर, श्री रेवले सर, फरांदे सर ,जगताप सर ,गुरव सर यांच्या मनोगतातील शब्दात आजही जी ताकद होती ती उर्जा निर्माण करणारी.

सर्वजण आपापल्या परीने पुढे जात आहे ही गोष्ट लक्षात आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होउन सर्वांनी अनाथाश्रमास हातभार लावण्याची भावना व्यक्त केली.

आभार ही औपचारिकता असली तरी मांडणं ही आनंदाची गोष्ट… आणि त्यामध्ये आपलेपणाची भर घालून रोहिणी डेरे यांनी सर्वांना निरोप देताना सर्वांनी पाचीपक्वान भरलेल्या ताटावर आपले मनसोक्त अधिराज्य गाजवले.

जन्मापासून मृत्यूपर्यंत राब राब राबवणे म्हणजे आयुष्य नाही हे लक्षात ठेवून मित्रांना/मैत्रिणींना कधीही विसरून चालणार नाही त्यांना जपलेच पाहिजे जर हे आपल्याला जमले तर सर्वजण कायम तरुण राहतील.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी महेश डेरे, राजेंद्र डेरे, हिंदुराव चव्हाण मधुकर डेरे, रोहिणी डेरे ,सुरेंद्र काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!