शिरगाव येथे खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन संपन्न
![]()
वाई तालुका कृषी विभागामार्फत विविध मोहिमांचे आयोजन, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन
वाई l प्रतिनिधी:
कृषी विभागामार्फत गावबैठकांमध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेताची पूर्वमशागत, निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी, घरचे सोयाबीन बियाणे वापरणे, तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढ करणे इ.विषयी माहिती देण्यात आली. बियाणे उगवणक्षमता, हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, बीजप्रक्रिया इ प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील महिला ग्रामसंघाच्या गटातील सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होतो
यावेळी कृषी सहायक श्री विनोद शेळके यांनी उपस्थित शेतकरी, महिलांनी पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची सामूहिक पध्दतीने उगवणक्षमता तपासणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले.
अवकाळी पाऊस पडल्याने हुमणी नियंत्रणाची योग्य वेळ असून यासाठी प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन केले व प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी माजी शिरगावच्या सरपंच सौ.निलम भोसले, ग्रा.पं.सदस्या सौ.सुवर्णा चव्हाण,महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ.सुरेखा भोसले व इतर महिला उपस्थित होत्या.













