Fri, Apr 17, 2026
कलाकार कट्टा

स्वाती व सुनील काळे दांपत्याची कलाकारी चित्रप्रदर्शनाद्वारे वाईकरांच्या भेटीला

स्वाती व सुनील काळे दांपत्याची कलाकारी चित्रप्रदर्शनाद्वारे वाईकरांच्या भेटीला
Ashok Ithape
  • PublishedMay 12, 2024

वाई, पाचगणी, महाबळेश्वरची निसर्गसंपदा टिळक ग्रंथालयात व्हॅलीज अँड फ्लॉवर चित्रप्रदर्शनात उपलब्ध

व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स ” या शीर्षकांतर्गत सुनील व स्वाती काळे या चित्रकारांचे लोकमान्य आर्ट गॅलरी वाई येथे भरलेल्या चित्रप्रदर्शनास वाईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भारतामध्ये अनेक राज्यात अनेक चित्रकार आहेत. या चित्रकारांना आपल्या कलाकृती नावाजलेल्या कलादालनात प्रदर्शित करण्यासाठी दिल्ली, मुंबई किंवा पुणे अशा अनेक मोठ्या शहरात जावे लागते. कारण ही महानगरे देशाची आर्थिक, सांस्कृतिक केन्द्रे आहेत. सर्व क्षेत्रातील नामांकीत मंडळी, चित्रकलारसिक अशा मोठ्या महानगरात वास्तव्याला असतात. अशा या व्यस्त महानगरात प्रत्येक आठवड्यामध्ये अनेक प्रदर्शने भरत असतात. या प्रदर्शनांमध्ये भारतातील सर्व राज्यांतील मान्यवर कलाकार मोठ्या उत्साहाने आपली कलाकृती सादर करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामूळे कलाकार कधीकधी तीन ते चार वर्षांचे आधीच बुकींग करून प्रदर्शनाची तयारी करत असतात.

परंतू प्रत्येकाला ह्या मोठया महानगरांमध्ये प्रदर्शने करणे शक्य होत नाही. छोट्या गावपातळीवर चित्रविक्री होत नसल्याने चित्रकारही अशा गावांमध्ये असुविधा असल्याने प्रदर्शने करण्याचे टाळतात.
पाचगणी, महाबळेश्वर ही महाराष्ट्राची प्रसिध्द थंड हवेची ठिकाणे व पर्यटनस्थळे सर्वानां माहीतच आहेत. या सुंदर गिरिस्थानाला अनेकांनी कधीतरी भेट दिलेली असते. परंतू अनेकदा त्या रस्त्यावरून जाताना ऐतिहासिक वाई हे गाव लागते मात्र तेथे मात्र पर्यटक मोठ्या प्रमाणावर थांबत नाहीत.

पाचगणीत जन्म झालेल्या व गेली तीस पस्तीस वर्षे एकाच विषयाचा सखोल अभ्यास करून या परिसराला नवनवीन पद्धतीने चित्ररुपात साकारणाऱ्या निर्सगचित्रकार सुनील व स्वाती काळे यांच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईकरांनी यापूर्वी पाहिलेली आहेत व स्मरणात ठेवलेली आहेत. आता हे प्रदर्शन वाई तालुक्यातील लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

लो.टिळक ग्रंथालय हे महागणपती घाटाच्या अगदी हाकेच्या अंतरावर मुख्य रस्त्यावर आहे . या ग्रंथालयाच्या कलादालनांमध्ये सुनील व स्वाती काळे या दाम्पत्यांनी साकारलेल्या शंभरहून अधिक जलरंगातील व तैलरंगातील उत्कृष्ट चित्रांचे आयोजित केलेले चित्रप्रदर्शन पाहणे एक वेगळा अनुभव आहे .

यावर्षी सुनील काळे यांनी पॅनोरामा आकारातील सिडने पॉईंट , पारसी पाईंट, ऑर्थरसीट पाँईट , केटस् पॉईंट टेबललॅन्डच्या पठारावरून दिसणारे कृष्णा नदीचे पात्र व वाईच्या धोम धरणाच्या जलाशयाची, गणपती घाट , गंगापुरी घाट , मधली आळी घाट, मेणवली घाट, मोतीबाग वाडा, जुने गणेश थिएटर, अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसणारी सुंदर चित्रे जलरंगात सादर केलेली आहेत . ही बहारदार चित्रे पाहताना त्या परिसरात फिरत असल्याचा दृश्यानूभव घेणे नक्की वेगळी अनुभूती असेल .या परिसरात गेली अनेक वर्ष जागेवर जाऊन भटकंती करत केलेली पाचगणीच्या रस्त्याची, धोम धरणाची, सह्याद्रीच्या कृष्णा व्हॅलीतील डोंगररागांची, जुन्या पारशी घरांची, वाईच्या व मेणवलीच्या पेशवेकालीन वाडयाची, महागणपतीच्या मंदीर परिसरातील, पेनने रेखाटलेली स्केचेसही आहेत. जलरंग हे माध्यम सहजपणे हाताळण्याची सुनील काळे यांची वैशिष्ठ्यपूर्ण सहजशैली लक्षात राहणारी आहे.

स्वाती काळे यांनी या पर्यटनस्थळांतील चित्रे साकार करताना परिसरातील वनश्री, वनसंपदा, जास्वंद, कॉसमॉस, हॉलीऑक्स, सुर्यफुले व कमळफुले यांची सुंदर,रंगीतदार मन प्रसन्न करणारी चित्रे अतिशय सहजपणे कॅनव्हासवर रेखाटली आहेत . नाजूकपणे तैलरंगात नाईफचा वापर करून डोळ्यांची पारणे फेडणारी, मनाला सुखावणारी असंख्य चित्रे रसिकांपुढे साकार केलेली आहेत. फुले ही माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. अगदी सुखाचा, अभिनंदनाचा पुष्पगुच्छ असो वा अंतिम प्रवासासाठी निघताना फुलांचा वर्षाव असो . फुले माणसाला लागतातच. ही फुले अनेकविध रंगाची असतात. त्याच्यां रंगाना मर्यादा नसतेच. या रंगीत फुलानां चित्रित करणे, त्यांच्या नाजूक आकारांचा, ठेवणींचा अभ्यास करून तैलरंगात नाईफने जोरकस फटकारे मारून त्यांच्यांत होणारे भावभावनांचे प्रकटीकरण करण्यात स्वाती काळे यांनी कमालीचे कौशल्य प्राप्त केले आहे . त्यांच्या या शैलीतील फुलांची चित्रे देशातील व परदेशातील अनेक नावाजलेल्या कलारसिकांनी, उद्योगपतीनीं विकत घेऊन आपआपली घरे सजवलेली आहेत. त्यांच्या चित्रातील फुले लहान मुलांसारखी हसतात, डौलतात, आनंदी व उत्साही वातावरण निर्माण करतात. ही चित्रे भिंतीवर पाहीली की एक प्रसन्न भावना व वेगळी ऊर्जा आंतरमनात निर्माण होते . कॅनव्हासवरील ही चित्रे पाहीली की वाटते आपण प्रत्यक्ष निसर्गफुलांच्या सानिध्यातच जागेवर उभे आहोत की काय ? असा भास नक्की होतो.

अशी वेगवेगळ्या पद्धतीने साकारलेली , जलरंग व तैलरंगातील वेगवेगळ्या माध्यमातील चित्रे पाहण्याची विनामूल्य संधी चित्ररसिकांनी सोडू नये.

दि. 1 मे रोजी सुप्रसिद्ध लेखक पानिपतकार श्री . विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले त्यावेळी श्री. शंतनू अभ्यंकर अध्यक्ष लो .टिळक ग्रंथालय , श्री . अनिल जोशी अध्यक्ष प्राज्ञपाठशाळा वाई , श्री . दत्ता मर्ढेकर जेष्ठ पत्रकार (ऐक्य ) , श्री .भद्रेश भाटे (सकाळ ), डॉ . चितांमणी केळकर , ॲड . एस .व्ही . कुलकर्णी , श्री . सुनील शिंदे , श्री . भालचंद्र मोने , चित्रकार श्री . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव . प्रा .मनिंद्र कारंडे या मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत व ग्रंथालयाचे सर्व कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

वसंत व्याख्यानमालेचे वक्ते श्री . विश्वास पाटील , महेन्द्र शिंदे, देवदत्त गोखले, प्रफुल्ल वानखेडे, सुचेता भिडे चापेकर , अशोक राणे, घनश्याम पाटील, मकरंद टिल्लू, डॉ .जगन्नाथ दिक्षित, व्यंत्रचित्रकार प्रशांत कुलकर्णी व रोहीत आर आर पाटील इ. मान्यवरांनी व अनेक वाईकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.

मे महिन्याच्या प्रचंड उन्हाळी महिन्यात वाई , पाचगणी महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसराचा दृश्यानुभव व वक्त्यांची उत्तम भाषणे ऐकण्याची संधी मिळाल्यामुळे सर्वांनी शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला आहे.

वाईतील रसिकांनी भेट देऊन ही संधी साधावी व वसंत व्याख्यानमाले सोबत कलाकारांच्या या कलाकृतींचा आस्वाद व आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
चुकवू नये असे हे निसर्गचित्रप्रदर्शन आहे.

स्थळ : लोकमान्य आर्ट गॅलरी.
लो . टिळक ग्रंथालय संचलित
गणपती आळी वाई. ४१२८०३

वेळ : सकाळी 10 ते 12 व
सध्यांकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत .

दिनांक : 1 ते 21 मे 2024

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!