Thu, Jan 15, 2026
पोलीस डायरी

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन
Ashok Ithape
  • PublishedApril 19, 2024

सातारा l प्रतिनिधी :

पुणे-बेंगलोर महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भिषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय 45 रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धिरज पाटील (वय 38 रा. ढवळी ता. वाळवा जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारत संवादमध्ये वितरण विभागात कार्यरत होते.

मंदार कोल्हटकर व धिरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या डावीकडून साताऱ्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही उडून अतिशय दूर फेकले गेले. महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून व्किड कार ही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनमध्ये येत हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरुनच क्विड कार चालक अनियंत्रित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, साताऱ्याच्या नाट्याक्षेत्रातील अनेक कलाकार यांनी गर्दी केली होती. साताऱ्याच्या नाट्या क्षेत्रातील मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते. त्याने काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता.

सदरची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात भेट दिली
आणि कोल्हटकर आणि पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले
आणि काहीही गरज भासल्यास जलमंदिराचे द्वारे कायम खुले असल्याचे सांगत धीर दिला.

मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजंती, पत्नी मयुरा, दोन मुले मितेश आणि मिहीर असा परिवार आहे.
धिरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई असा परिवार आहे.

मंदार कोल्हटकर यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. 19 रोजी संगममाहुली येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर धिरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ढवळी याठिकाणी होणार आहे.
या दोघांच्या अपघाताने तरुण भारत परिवार, साताऱ्यातील नाट्यकर्मी व वृत्तपत्र कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!