Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी यांना ‘संबोधी’चा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी यांना ‘संबोधी’चा पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedMarch 7, 2024

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत गौतमीपुत्र कांबळे (सांगली )यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) पाठक हाॅल मध्ये होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार.

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी मराठी विश्वकोश कार्यालयाचे निवृत्त संपादक, विज्ञान विभाग प्रमुख ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत वाईचे सतीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या जन्मदिनी येत्या २६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सतीश कुलकर्णी यांना ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत गौतमीपुत्र कांबळे (सांगली )यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) पाठक हाॅल मध्ये होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या वर्षीच्या पंधराव्या पुरस्काराचे मानकरी सतीश कुलकर्णी फुले-आंबेडकरी साहित्य व विचारांचे गाढेअभ्यासक व वक्ते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध विचार पैलूंवर तसेच सामाजिक सांस्कृतिक विषयावर त्यांचे दोन हजारांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन केले आहे. आंबेडकरी साहित्य व विचार विश्वाचे दहा हजारांवरील ग्रंथसंग्रह त्यांच्या ‘शिल्पकार’ या घरांमधील ग्रंथालयात आहे.

आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते,लेखक, विचारवंत, संपादक, अभ्यासक यांच्याशी त्यांचा घनिष्ठ वैचारिक आणि जीव्हाळ्याचा स्नेह आहे.

त्यांचा वाईचे प्रसिद्ध रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान व लोकमान्य टिळक स्मारक संस्था यांच्या वैचारिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच सहभाग राहिलाआहे.

राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ,वाई भूषण पुरस्कार ,भीम रत्न पुरस्कार तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचा ग्रंथ मित्र शिवाजीराव चव्हाण स्मृती पुरस्कार व वाईच्या किसान विकास फाउंडेशनच्या सामाजिक क्रृतज्ञता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
संबंधित प्रतिष्ठानचा पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!