Thu, Jun 4, 2026
अभिष्टचिंतन

पत्रकार घडविणारं विद्यापीठ गुरुवर्य शरद महाजनी उर्फ अण्णा यांचे पत्रकार महेंद्रआबा यांना वाढदिवसानिमित्त शब्दरूपी आशीर्वाद

पत्रकार घडविणारं विद्यापीठ गुरुवर्य शरद महाजनी उर्फ अण्णा यांचे पत्रकार महेंद्रआबा यांना वाढदिवसानिमित्त शब्दरूपी आशीर्वाद
Ashok Ithape
  • PublishedMarch 3, 2024

आबा….
काही माणसे पण गोड नावे घेऊन जन्माला येतात की काय कोण जाणे.पण ते नाव त्या माणसाच्या स्वभावाला अनुसरून इतके चपखल बसते की तीच त्याची ओळख होऊन जाते.अशा नावातच आपलेपणा,प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जाणवत असतो.एवढा की,ही नावेच ऋणानुबंध जोडून जातात.आबा हे नाव याच जातकुळीतील.तो वयाने,कर्तृत्वाने किती पण मोठा झाला,तरी त्याला आबासाहेब असे म्हणावेसे वाटत नाही.

डोक्यावर बर्फ,मुखात साखर आणि पायाला चाके ही आबाच्या जगण्याची तऱ्हा आहे.नाही हा शब्द त्याच्या शब्द कोशात नाही.हो, करतो ही आबाची गॅरंटी असते.कधी कोणाला न दुखवता तो सर्वांसाठी जणू देवदूत म्हणून काम करतो. स्व.भाऊसाहेब महाराज,आ.शिवेंद्रराजे यांचा स्वीय सहाय्यक. अशी त्याची वेगळी ओळख आहे. पण ती जेव्हा त्याला काही कामे करून घ्यायची असतात,मार्गी लावायची असतात तेव्हाच तो ती ओळख धावतो.बाकी कुटुंब,मित्र परिवारासाठी तो आबा असतो.

पुढारी मध्ये त्याची ओळख झाली ती वार्ताहर,मिमिक्री करणारा कलाकार,हरकाम्या म्हणून.पण त्या चेहऱ्या आडचा आबा मी जास्त अनुभवला आहे,जवळून पाहिला आहे.तो एक संवेदनशील माणूस आहे.कुटुंबावर प्रेम करणारा बाप माणूस आहे.पत्नी बद्दल अधिक हळवा आहे की मुलांबद्दल ते सांगणे अवघड आहे.पण या गोड लेकरांबद्दल बोलताना तो आई अधिक,बाप कमी जाणवतो.त्याचे ते कौतुकाचे शब्द,भावना हृदयातून उमटतात.असे कुटुंब हे त्याला देवाने दिलेले वरदान आहे.त्याच्या माता पित्याची ती पुण्याई आहे.मैत्रीच्या दुनियेतला तो राजा माणूस आहे.त्याच्याविना मैत्रीची मैफिल पूर्ण होऊ शकत नाही.

आबा खूप मोठ्या संकटावर मात करून जणू पुन्हा नवीन जन्म घेऊन अवतरला आहे.त्या काळात त्याची ती लढाई एकट्याची नव्हती. राजाश्रय,लोकाश्रय अशी शक्ती त्याच्या पाठीशी उभी होती.त्याचे कुटुंब,मित्र,अनेक ज्ञात, अज्ञात हात त्याच्या बरोबर होते. या साऱ्याची जाणीव त्याने जपली आहे.हे कृतज्ञ भाव त्याच्या आबा या नावातील सत्य,वास्तव आहे.

आबा आणि अण्णा हे नाते असेच आहे.तो मला गुरुस्थानी मानतो,पण मी तशी भावना मनात कधी ठेवत नाही.फारतर मोठा भाऊ हे नाते अधिक शोभून दिसेल.पण तो ते कितपत मान्य करेल सांगता येत नाही.तोच काय त्याचे जीवाभावाचे मित्र पण तसेच.असो.आज तुझा वाढदिवस साजरा होत असताना असा आनंद ,अभिमान वाटतो,त्याचे मोल करता येणार नाही.आबा,असाच मोठा हो,पण आबा म्हणूनच रहा.

शरद महाजनी-

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!