सातारा शहरातील ९ कामांसाठी ३ कोटी ३० लाख मंजूर आ. शिवेंद्रसिंहराजे; नगरविकास विभागाकडून मिळवला निधी
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
सातारा शहरात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शहरातील आणखीन ९ विकासकामे मार्गी लावण्यासाठी ३ कोटी ३० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून राज्याच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हा निधी मंजूर केला आहे.
निधी मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
शहरातील पेढ्याचा भैरोबा येथील उद्यान विकसित करणेसाठी १ कोटी, विलासपूर, गोळीबार मैदान येथे रस्ते खडीकरण, डांबरीकरण आणि गटर करणेसाठी ९० लाख, मोरे कॉलनी महादरे रॉड येथे रस्ते खडीकरण, डांबरीकरण व गटर बांधणेसाठी ५० लाख, चैतन्य कॉलनी, गणेश कॉलनी, तामजाई नगर येथे बंदिस्त गटर करणेसाठी १५ लाख, भैरवनाथ कॉलनी, पिलेश्वरी नगर येथील ओपन स्पेसमध्ये वॉल कम्पाऊंड व बगीचा करणेसाठी २० लाख, प्रायमरी सैनिकी स्कुल ते शशी धुमाळ घर अखेर रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, प्रभाग ३ मध्ये किशोर लोखंडे घर ते कल्पशिल्प अपार्टमेंट अखेर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, जयमल्हार हौ. सोसायटी येथे चतुर घर ते जरंडेश्वर मंदिर अखेर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे २० लाख आणि जयमल्हार हौ. सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीट करणेसाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
दोनच दिवसांपूर्वी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून शहरातील ४४ विकासकामे मार्गी लावण्यासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यांनतर आता आणखी ९ कामे मार्गी लावण्यासाठी ३ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा शहरात विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका सुरु ठेवला आहे. यामुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.













