Mon, Mar 2, 2026
क्रीडा

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नूतन वरखडेस सुवर्णपदक

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नूतन वरखडेस सुवर्णपदक
Ashok Ithape
  • PublishedFebruary 28, 2024

बंधू भूषण वरखडे यानेही ‘खेलो इंडिया’मध्ये केली आहे चमकदार कामगिरी.

वाई / प्रतिनिधी –

वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी कु. नूतन संदीप वरखडे हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी शालेय क्रीडा स्पर्धेत सेबर क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक मिळवले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नूतन वरखडे ही वाई तालुक्याच्या पश्चिमेकडील वरखडवाडी या दुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. कोणत्याही सोयी सुविधा व यंत्रणा उपलब्ध नसतानासुद्धा प्रतिकूलतेवर मात करत मोठ्या जिद्दीने तलवारबाजी क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील प्राविण्‍याबरोबरच तीचा शैक्षणिक नित्यक्रमातही आलेख उत्तम आहे. तिचा मोठा भाऊ भूषण वरखडे यानेसुद्धा बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असतानाच तलवारबाजी या क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ या क्रीडा स्पर्धेत त्याने भरीव कामगिरी करत उज्वल यश संपादन केले आहे.

या दोन्ही बंधू-भगिनींनी क्रीडा क्षेत्रात वरखडवाडी गावासह वाई तालुक्याचे व सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले असून त्यांच्या विजयी कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

विशेषता अकरावी विज्ञान शाखेत अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ख्याती मिळवत असताना तलवारबाजी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सहा. शिक्षक, शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक गौतम भुरके आदी उपस्थित होते. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक, तसेच आई-वडील, भाऊ तसेच हितचिंतकांचे नूतनने आभार मानले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!