कुसवडे धरणासाठी ३१.५८ कोटी रुपये निधी मंजूर जलसंपदा विभागाकडून मिळाला निधी
भुईंज l महेंद्रआबा जाधवराव :
सातारा तालुक्यातील कुसवडे लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत कुसवडे गावाजवळील स्थानिक ओढयावर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असून सदर प्रकल्पाव्दारे एकुण ३.४९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा (उपयुक्त पाणीसाठा ३.३६३ द.ल.घ.मी.) होऊन सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यामधील २ गावांतील ३५२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ३१.५८ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
धरणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे यासाठी पाणी वितरण व्यवस्था, धरण पोहोचच रस्ता आदी कामे उरली होती. यासाठी निधी मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून कुसवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या योजनेस दुसरी सुधारित मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग दरसूची सन २०२२ – २०२३ वर आधारित रु. ३१ कोटी ५८ लाख ३८ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून धरणापासून पाणी वितरण व्यवस्था उघड्या पाईपलाईन ऐवजी बंदिस्त नलिका टाकून करण्यात येणार आहे. तसेच धरणाकडे जाणारा पोहोच रस्ता आदी कामे या निधीतून मार्गी लागणार आहेत. या धरणाच्या लाभक्षेत्रात कुसवडे आणि भाटमरळी या गावातील शेती सिंचनाखाली येणार आहे. निधी उपलब्ध झाल्याने बंदिस्त नलिकेचे काम मार्गी लागणार असून धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.













