Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

प्रेरणा संवादातून बालमित्र मैत्रिणींच्या शिवगर्जनेने दुमदुमला किल्ले दातेगड

प्रेरणा संवादातून बालमित्र मैत्रिणींच्या शिवगर्जनेने दुमदुमला किल्ले दातेगड
Ashok Ithape
  • PublishedFebruary 20, 2024

निर्मळ मन, स्वच्छ बुद्धी आणि कधी न कमी होणाऱ्या कार्यशक्तीसाठी प्रेरणा संवादचा अनोखा उपक्रम

१९ फेब्रुवारी म्हटलं की प्रेरणा संवादच्या बालमित्र मैत्रिणींनीसाठी हा दिवस नवपर्वणीच असतो.
अगदीच सांगायचे झाले तर काल १९ फेब्रुवारी संपला असली तरी पुढील वर्षी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याची आतुरतेने वाट पाहणारी ही चिमुकले आणखी नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या किल्याची वाट सर करण्यासाठी आयोजनाची वाट पाहणारेच.

शेकडो डोक्यावर परिधान केलेली पांढरी टोपी आणि त्यावर उमटलेले भगवे झेंडे, रंगबिरंगी रिबीनने सजलेले हात, छातीवर लटकलेले ओळखपत्र आणि मुखातून बाहेर पडणारी शिवगर्जना देत संयोजकांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे काल १९ फेब्रुवारी सोमवार रोजी प्रेरणा संवाद टिम आपल्या बालमित्र मैत्रिणी यांना घेऊन पाटण तालुक्यातील किल्ले दातेगड येथे जाऊन शिवजयंती उत्सव साजरा केला.

सकाळी प्रथमतः पाचवड ता. वाई येथे दातेगड येथे मार्गस्थ होण्याअगोदर दोन्ही बसचे विधिवत पूजन श्री सोनावणे आप्पा आणि श्री सत्यविजय पवार तात्या यांचे हस्ते करण्यात आले. सातारा सज्जनगड ते दातेगड या वाटेवर पावसाळ्यात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या ठोसेघरच्या प्रवेशद्वारावर सर्वांनी पोटभरून नाश्ता केला आणि तेथेच प्रेरणा संवादचे मार्गदर्शक डॉ श्री मोहन सोनावणे सर यांनी पुढील प्रवासाची दिशा ठरवत योग्य आखणी केली आणि इतिहास गाढे अभ्यासक श्री धनावडे गुरुजी यांनी दातेगड किल्ला आणि चोहोबाजूच्या परिसराची तसेच किल्ल्याकडे जाणारा रस्ता चाळकेवाडीचे पठार जे पवन चक्यांनी केलेल्या गर्दीतून तसेच पुढे असलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या भागातून आपल्याला पुढे घेऊन जाईल याची प्राथमिक ओळख करून दिली

भौगोलिक दृष्ट्या मध्यम चढाई असणाऱ्या गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३४२५ फूट उंचीवर असलेला दातेगड आपल्या विविध गुणांनी ओळख जपणारा, राखणारा असला तरी यातील मुख्य वेगळेपण म्हणजे या किल्ल्यावर असलेली तलवारीच्या आकाराची विहीर ही प्रमुख आकर्षण.

वय वर्षे ८१ असणारे इतिहास गाढे अभ्यासक श्री धनावडे गुरुजी नेहमी प्रमाणे मुलांबरोबर दिवसभर तितक्याच उत्साहाने, वेगाने आणि तत्परतेने टप्या टप्प्यावर त्या त्या भागाची ओळख करून सर्वांच्या ज्ञानात भर घालत होते, आणि त्याच भागात असणारे श्री क्षेत्र धारेश्वर मंदिर अगदी अचंबित करणारे म्हणजे हजारो जण आत सामावतील एवढया भल्या मोठ्या महाकाय गुहेत असणारे श्री महादेवाचे दर्शन आणि त्याच सहवासात शांत, शितल वातावरणात सर्वांनी भोजन करून नैसर्गिक जलस्त्रोताचा भागवलेली तहान ही कायमच आठवणीत राहणारी.

पुन्हा मार्गस्थ मार्गावर मानव निर्मित असणारे पवनचक्यांचे जंगल म्हणजे पापणी लवतेय ना लवतेय तोच वीज निर्मितीसाठी गरगर फिरणारे पाते चक्रावून सोडणारे,
सातारा सज्जनगड ते ठोसेघर रोडवर वसलेल्या बोरणेगावात श्रीमती काशीबाई माधवराव गावंड यांचे वस्तू संग्रहालयातील समृद्ध, प्राचीन भारताची वैभवशाली संस्कृती, शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे,  मुघल, मराठा, रजपूत, ब्रिटिश नाणी, पुरातन भांडी, गारगोटी राजे आणि युद्धकालीन वस्तू यांचा अनोखा पहायला मिळालेला नजराणा…

बालमित्रांनी सादर केललेले पोवाडे, शिवगर्जना, हस्तचित्रकला ही तर शिवजयंती उत्सवाला दिलेली विशेष उंची.

प्रेरणा संवादचा उद्देश
प्रेरणा संवाद हा एक विचार आहे आणि तो निर्मळ मन, स्वच्छ बुद्धी आणि कधी न कमी होणाऱ्या कार्यशक्तीला बळकटी देण्यासाठी दरवर्षी नवीन किल्ल्याची आणि परिसराची निवड करून बालमित्र मैत्रिणी यांना सोबत घेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची ओळख करून देण्याचे काम करून एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्याचा उदात्त हेतूला आता अखंडित ९ वर्षे पूर्ण.

तिरंगा इंग्लिश स्कूल पाचवड यांची विशेष सेवा
सुखकर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सर्वांनाच हवा असतो त्यामुळे पालकवर्ग आणि संयोजक सुद्धा निश्चिंत म्हणून दरवर्षीप्रमाणे तिरंगा इंग्लिश स्कूलचे सचिव पैलवान श्री जयवंतआबा पवार हे नेहमीच प्रेरणा संवादाच्या बालमित्र मैत्रिणींसाठी बस उपलब्ध करून देत असतात.

भुईंजच्या गुड्डी स्विटची अल्पोपहार सोय
भल्या पहाटे निघणाऱ्या सर्वांसाठी म्हणजेच अगदी मुंबईतून दाखल होणाऱ्या मुलांना सकाळी सकाळी नाश्ता आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणारे भुईंज येथील गुड्डी स्विटचे सर्वेसर्वा राजेआबा.

लक्षवेधी
वय वर्षे १ असणारा आरुष चकाले आणि श्री धनावडे गुरुजी वय वर्षे ८१ आणि डॉ सोनावणे यांच्या मातोश्री ताई वय वर्षे ६१ यांची किल्ले दर्शनासाठी असलेली उपस्थिती लक्ष वेधून घेणारी.

गेले महिनाभर सूक्ष्म नियोजन करण्यासाठी संयोजकांनी केलेली आखणी आणि त्याची वेळेत कार्यवाही करून केलेली अंमलबजावणी यामुळे प्रेरणा संवादची किल्ले दर्शन शिवजयंती उत्साहात पार पडली.

दिपक पवार, चिंधवली

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!