मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय
भुईंज । महेंद्रआबा जाधव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव गेल्या पाच महिन्यांपासून लढा देत असले तरी तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असून त्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे. मध्यरात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी ही घोषणा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलले, त्याला तोड नाही. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला.
मनोज जरांगे यांच्या घोषनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे. सर्व मागण्या मान्य झाल्याचे समजताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाला आहे, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.
७० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणापासून वचिंत होता, अनेक वेळा त्यासाठी लढा दिला पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर आरक्षण हुलकावणी द्यायचं. पण आज मनोज जरांगे दादांसारखा प्रामाणिक नेता मराठा बांधवाना भेटला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आज हा मराठ्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. मराठे शांततेत सुद्धा युद्ध जिंकू शकतात, हे जरांगे-पाटील व सकल मराठा समाजाने दाखवून दिले आहे.













