कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा – निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील
सातारा दि. 23 (जि.मा.का) :-
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा- कुणबी, कुणबी मराठा, आणि कुणबी च्या नोंदी शोधण्याकरिता सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने समिती तयार केली होती. समितीकडून मिळालेल्या सूचनांनुसार कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याकरिता सातारा जिल्ह्यामध्ये विशिष्ट कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नोंदी शोधण्याची कार्य जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आणि विविध विभागांच्या माध्यमातून केले गेले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहायता कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्या मार्फत कुणबी प्रमाणपत्र मिळवणे कामी येणा-या अडी-अडचणी सोडविण्याचे कामकाज केले जात आहे.
जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू करणेत आलेली आहे. सातारा जिल्ह्यात आढळून आलेल्या नोंदी तालुकानिहाय https://www.satara.gov.in/ या सातारा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्हावासियांना या अनुषंगाने आवाहन करणेत येत आहे की कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या तालुक्याचे तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी, तथा जिल्हा समन्वय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, नागेश पाटील यांनी कळविले आहे.













