सामान्य माणसांच्या हृदयात राहणारा नेता म्हणजे लक्ष्मणरावतात्या – प्रमोद शिंदे
वाई l प्रतिनिधी, दि. १७ : सातारा जिल्ह्यात पोलादी पुरूष म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार लक्ष्मणरावतात्या पाटील म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमणारा नेता होय. सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळेच सामान्य माणसांच्या हृदयात राहणारा नेता म्हणजे लक्ष्मणरावतात्या पाटील असल्याची भावना किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोददादा शिंदे यांनी व्यक्त केली.
माजी खासदार लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त किसन वीर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमोददादा शिंदे पुढे म्हणाले की, तात्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात गावच्या सरपंच पदापासून सुरू केली. तद्नंतर त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन, किसन वीर कारखान्याचे चेअरमन, राज्य बँकेचे संचालक व खासदारीकीपर्यंत मजल मारली. या कार्यकाळामध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन समरस होण्याची कला त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये तात्यांचे स्थान निर्माण केले होते.
अभिवादन कार्यक्रमास वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन तथा संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, मार्केट कमिटीचे संचालक पोपटराव जगताप, राजेंद्र सोनावणे, विजय शिंगटे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













