मातृभक्त असणारी माणसे इतिहास घडवतात – ॲड. उमेश सणस
वाई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त होते. त्यांनी केलेल्या प्रत्येक मोहिमेवर जिजामाऊलींच्या संस्कारांची छाप होती. शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत लुटताना भिल्ल असणाऱ्या दामाराजाला मोहिमेच्या अग्रभागी ठेवले व मोहीम फत्ते केली. स्वतःच्या राज्याभिषेकावेळी दामाराजाला बोलवून त्याचा सन्मान केला. हे शिवाजीराजांकडे आले ते जिजाऊ माऊलींच्या संस्कारांतून. त्यांची आईवर अपार निष्ठा होती. छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त होते, आणि मातृभक्त असणारी माणसेच इतिहास घडवतात असे प्रतिपादन शिवचरित्राचे लेखक ॲड. उमेश सणस यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात छत्रपती शिवरायांची मातृभक्ती या विषयावरील प्रबोधन पर व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शेंदुरजणे गावचे उपसरपंच रामचंद्र जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संजय भिकू जाधव, माजी सरपंच सुरेश जगताप, डॉ अरुण सोनकांबळे , प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ.अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
सणस म्हणाले, वयाच्या १६ व्या वर्षी रांझाच्या पाटलाला शिक्षा करण्याचे बळ, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणण्याचे संस्कार व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याची दृष्टी शिवरायांना जिजाऊंनी दिली होती. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या प्रदेशांशी जिजाऊंचे भावनिक नाते होते.त्या स्वराज्याच्या आधार व सामर्थ्य होत्या. यवनांच्या आक्रमणांनी बेचिराख झालेले पुणे जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने सुजलाम सुफलाम केले त्यामुळे त्या सर्वसामान्यांच्या लोकमाता ठरतात.
आपल्या मनोगतात मा. संजय भिकू जाधव म्हणाले, हिरा नावाची गवळण लेकराच्या ओढीने रायगडाचा अवघड कडा उतरली, या घटनेचे कौतुक करून शिवरायांनी तिला साडीचोळी केली आणि कड्याला हिरकणी असे नाव दिले. असे आपले शिवाजी महाराज कदरदान राजे होते.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. ॠतुजा जगताप हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राची जगताप हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमास चेतन तावरे, विजय गायकवाड, शिवाजी नवले, महेंद्र येवले, केशवराव गायकवाड तसेच शेंदुरजणे गावातील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.





















