कोकण फिनकॅप बँकेच्या eaz₹ ॲप चे अनावरण, आयपीएस प्रसाद अक्कानवरू यांच्या “युगे युगे उदय सूर्यराजाचा..” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळाही उत्साहात
नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी :
कोकण फिनकॅप को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे नुकतेच eaz₹ या ॲपचे अनावरण वाशी येथील तुंगा रिजन्सी या आलिशान हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले. व्यवसाय वृद्धीसह सामाजिक बांधिलकीतून तयार करण्यात आलेल्या या ॲपद्वारे शिक्षण आणि आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी नागरिक व खातेदारांना सहकार्य होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अजय तांबे व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास राकेशजी शंकरराव गायकवाड, सौ. प्रणालीताई गायकवाड, पोलीस अधिकारी अजित पाटील, बँकेच्या संचालिका सौ. रुपाली तांबे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतीत पारे, eaz₹ ॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सबरजीतसिंह, सौ. कुंदल मुद्दर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कोकण फिनकॅप को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संस्था परिवारातर्फे शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणींवर मात करण्यासाठी क्रेडिट कार्ड प्रमाणे तातडीची रक्कम मिळण्यासाठी मोबाईल वर चालणारे हे ॲप तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग करून गरजू व्यक्तींनी आपल्या अडचणींवर मात करावी असे आवाहन यावेळी विविध मान्यवरांनी केले, तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयपीएस अधिकारी प्रसाद अक्का नवरी यांच्या “युगे युगे उदय सूर्यराजाचा..” या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व प्रमुख घटकांनी ॲपविषयी माहिती दिली तसेच गरजूंनी लाभ घेऊन प्रगती साध्य करावी, असे आवाहनही केले.
खातेदार ग्राहकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी या ॲपविषयी समाधान व्यक्त केले, तसेच कोकण फिनकॅप बँकेचा सर्व महाराष्ट्रभर विस्तार व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.













