Sat, Apr 18, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

महाबळेश्वर तालुक्यात अनाधिकृत बांधकाम, उत्खनन, विनापरवाना वाणिज्य वापराला पायबंद घालणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

महाबळेश्वर तालुक्यात अनाधिकृत बांधकाम, उत्खनन, विनापरवाना वाणिज्य  वापराला पायबंद घालणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedSeptember 14, 2023

सद्यस्थितीत सुरु असणा-या विना परवाना बांधकामांवरही कारवाईचे आदेश

सातारा दि. 14 (जि.मा.का) :- महाबळेश्वर तालुक्यात होणारे अनाधिकृत बांधकाम, उत्खननावर सक्त कारवाई करणेत येईल. तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी महाबळेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येणारे बांधकाम व उत्खनन हे सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेवून करण्यात यावे. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत उत्खनन होणार नाही याची दक्षता स्थानिकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

        जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकाम, विनापरवाना वाणिज्य वापर तसेच बेकायदेशीर उत्खननावर आळा घालण्यासाठी महाबळेश्वर ग्रामस्तरावर संयुक्त समिती गठित केली असून सदर समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक व नगरपरिषद स्तरावर त्यांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

        महाबळेश्वर तालुक्यात १०० टक्के प्लास्टिक बंदी करण्यासाठी महसूल विभाग, नगरपरिषद विभाग व वनविभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डूडी यांनी दिल्या. महाबळेश्वर येथील हिरडा विश्राम गृह येथे आयोजित बैठकीमध्ये शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करताना प्लास्टिक बंदी बाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महाबळेश्वरच्या पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी १०० टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

          महसूल विभाग,नगरपरिषद विभाग व वन विभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करून ठोस पावले उचलण्याचे आदेश सदर बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले. महाबळेश्वर शहरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही त्यांनी संबधित विभागांना सूचना दिल्या. यामध्ये शहरातील व परिसरातील सर्व मोकळ्या जागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी पार्किग सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

डॉ.साबणे रोड येथील सुशोभीकरणाबाबत नव्याने तयार केलेला पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करून तेथील व्यापारी व नागरिक यांच्याशी बैठक घेऊन  सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात यावे, असे सूचित केले.

सद्यस्थितीत सुरु असणा-या विना परवाना बांधकामावर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रशासनाला आदेश

          महाबळेश्वरमधील हिरडा विश्राम गृह येथे जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र डूडी  यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामे व प्रश्नांच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील सद्य स्थितीत सुरू असणाऱ्या विनापरवाना बांधकामवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

          महाबळेश्वर नगरपरिषद व हिलदारो माध्यमातून सुरु असणाऱ्या उपक्रमाबाबत घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केंद्र उभारण्यासाठीच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर हरित व स्वच्छ शहर बनविण्याच्या अनुषंगाने प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबविण्याचे आदेश त्यांनी  प्रशासनाला दिले.  शहरातील डॉ.साबणे रोड व वेण्णा लेक सुशोभिकरणाबाबत तसेच शहरातील वाहतूक आराखडा व पार्किंग व्यवस्थे बाबत तात्काळ सुधारणा अंमलात आणण्यात याव्यात. असे आवाहन श्री‍ जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!