संकल्प न्यूजच्या बातमीवर भुईंजचे उपसरपंच शुभम पवार कडाडले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी
भुईंज ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीत लाखोंचा अपहार झाल्याची तक्रार भुईंज ग्रामस्थांनी केली आहे.
त्याबाबतचे वृत्त संकल्प न्यूजने प्रसिद्ध करताच एकच खळबळ उडाली.
यावर प्रतिक्रिया देताना उपसरपंच शुभम पवार म्हणाले, की भुईंज ग्रामपंचायतीने जनतेच्या पैशातून सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी केली ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही खरेदी बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक दराने झाल्याचे स्पष्ट झाले असून ही बाब निषेधार्ह आहे. जनतेच्या पैशांचा अशापद्धतीने गैरवापर होत असेल तर तो योग्य नाही.
ग्रामस्थानीच माहितीच्या अधिकाराखाली आणि बाजारातून त्याच साहित्याचे कोटेशन प्राप्त करून हा गैरप्रकार उजेडात आणला आहे. त्याचा त्यांना हक्क व अधिकार आहे. त्या अधिकारातून त्यांनी जागरूक नागरिकांचे कर्तव्य पार पाडले आहे.
या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उदभवत नाही त्यामुळे तसा प्रयत्न देखील कोणी करू नये.
जनतेच्या प्रत्येक रुपयाचा गांभीर्याने वापर होणे आवश्यक असताना जनतेचा पैसा अशा पद्धतीने कोणी व्यक्तिगत स्वार्थाने लाटत असेल तर ते चालणार नाही.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन जनतेचा पैसा कोणी गैरमार्गाने हडपला असेल तर तो वसूल होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाने आधीसारखी वेळकाढू भूमिका न घेता तातडीने चौकशी करावी.













