२४ तासांत रोड रॉबरीचा छडा; चार आरोपी जेरबंद!
सराफी व्यावसायिकाला तलवारीचा धाक दाखवून लुटलेले ११.५० लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; स्विफ्ट कार आणि हत्यारही जप्त
सातारा : प्रतिनिधी
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवापूर ते पळसावडे रस्त्यावर सराफी व्यावसायिकाला मोटारसायकलवरून जात असताना स्विफ्ट कारने पाठीमागून धडक देऊन जखमी करत तलवारीचा धाक दाखवून लुटल्याच्या धाडसी रोड रॉबरीचा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि हत्यार असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या देवापूर ते पळसावडे रस्त्यावर सराफी व्यावसायिक नवनाथ वसंत खुपकर (रा. पळसावडे) हे मोटारसायकलवरून जात होते. यावेळी निर्जन ठिकाणी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांना जखमी करून तलवारीचा धाक दाखवत दमदाटी करण्यात आली आणि त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून आरोपी स्विफ्ट कारमधून सांगली जिल्ह्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ३०९ (६), ३०९ (३) (५) प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नियुक्त केले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे, गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींच्या हालचालींचा अभ्यास केला. सातारा, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करण्यात आली. तसेच आरोपी पसार झालेल्या मार्गाचा माग काढत गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत सोलापूर जिल्ह्यातील संशयित आरोपींची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. गुन्ह्यानंतर संशयित आरोपी आपल्या गावातून पसार झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. पथकांनी वेषांतर करून संशयितांच्या परिसरात लक्ष ठेवले होते.
दरम्यान, संशयित आरोपींपैकी तिघे सोलापूर जिल्ह्यातील धुळदेव-पिलीव घाट परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेत अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात आणखी आरोपींचा सहभाग उघड झाला.
या रोड रॉबरीचा कट स्थानिक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने सराफी व्यावसायिकाच्या हालचालींवर पाळत ठेवून सोलापूर जिल्ह्यातील आरोपींना बोलावले होते. त्यांच्या मदतीने लुटीचा कट प्रत्यक्षात आणण्यात आला. तसेच मुख्य आरोपींना गुन्ह्यानंतर त्यांच्या अन्य साथीदारांनी आश्रय देऊन लपवून ठेवल्याचेही समोर आले. या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
११.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लुटलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि हत्यार असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
१. अजय सत्यवान शिरतोडे, रा. वाकी शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर.
२. शुभम दुर्योधन बोडरे, रा. वाकी शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर.
३. रोहित दादासाहेब जाधव, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर.
४. सुनील मारुती मंडले, रा. देवापूर, ता. माण.
वरिष्ठांकडून पोलीस पथकाचे कौतुक
धाडसी रोड रॉबरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, अभिजित यादव, रोहित फार्णे, परितोष दातीर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.





















