Sun, Nov 29, 2026
क्राईम न्यूज

सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ३४.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ३४.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Ashok Ithape
  • PublishedNovember 28, 2026

अवैध देशी दारू वाहतूकप्रकरणी एकाला ताब्यात; आयशर ट्रकसह १५.३६ लाखांची दारू जप्त, संशयित क्रेटा वाहनाचा शोध सुरू

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत देशी दारूचे बॉक्स, आयशर ट्रक आणि मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ३४ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान ट्रकसोबत असलेले क्रेटा वाहन पोलिसांना चकवा देऊन पसार झाले.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दि. २८ नोव्हेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत कराडकडून पुण्याच्या दिशेने एका आयशर ट्रकमधून अवैध विनापरवाना दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला महामार्गावर गस्त घालून संबंधित वाहन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी दोन पथके तयार करून एक पथक पिरवाडी येथील किया शोरूमसमोर, तर दुसरे पथक वाढे फाटा येथे तैनात केले. दरम्यान, सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास कराडकडून पुण्याच्या दिशेने आयशर ट्रक व त्यासोबत क्रेटा वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी वाहनांना थांबण्याचा इशारा केला असता, दोन्ही वाहने वेगाने पुढे निघाली.

डी.बी. पथकाने पाठलाग सुरू केला. क्रेटा वाहन पुण्याच्या दिशेने पसार झाले, तर आयशर ट्रक आनेवाडी पुलाखालून मर्ढे गावाकडे वळला. पोलिसांनी वाहनांना आडवे लावून मर्ढे येथे ट्रक थांबविला. चालकाने ट्रकमध्ये पिण्याच्या पाण्याचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, तपासणीदरम्यान ट्रकमध्ये देशी दारूच्या टँगो पंच ब्रँडचे बॉक्स आढळून आले.

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला व पंचनामा करून १५ लाख ३६ हजार रुपये किमतीची देशी दारू, १८ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक आणि ८१ हजार २०० रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅण्डसेट, असा एकूण ३४ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात महेंद्र आनंदा डुबल (वय ३४, व्यवसाय चालक, रा. कामठी अळी, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. शुक्रवार पेठ, कराड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जमीर हारुन पटेल (रा. मलकापूर, कराड, जि. सातारा) आणि मंगेश एकनाथ हरपळे (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) यांची नावेही तपासात समोर आली आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, वैभव माने, राकेश सातपुते, प्रकाश रणबागले व पोलीस मित्र असिफ शेख यांनी केली.

अवैध दारू वाहतुकीविरोधात सातारा शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पसार झालेल्या क्रेटा वाहनाचा शोध सुरू आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!