Sun, Nov 29, 2026
शिक्षण

दुर्गम भागातील शिक्षणाच्या वटवृक्षाला विकासाची नवी पालवी!

दुर्गम भागातील शिक्षणाच्या वटवृक्षाला विकासाची नवी पालवी!
Ashok Ithape
  • PublishedNovember 28, 2026

बोरगावच्या शैक्षणिक संस्थेचा गौरवशाली सोहळा उत्साहात; विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप, नूतन इमारतीचे उद्घाटन आणि गुणवंतांचा सन्मान; मंत्री मकरंद आबांकडून १४ लाखांच्या मदतीची घोषणा

बोरगाव, दि. २८ : प्रतिनिधी

डोंगरदऱ्यांत वसलेल्या आणि पावसाळ्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना करणाऱ्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ, बोरगाव या संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करणारा सोहळा उत्साहात पार पडला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप, नूतन शालेय इमारतीचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान आणि प्रेरणादायी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला. यावेळी संस्थेच्या इमारतीच्या प्रस्तावासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी १४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते नूतन शालेय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रतापराव अण्णा पवार, संस्थाध्यक्ष नारायण वाडकर, संस्थेचे माजी अध्यक्ष तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिनकरराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव बापू शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रांत भैय्या डोंगरे, उपसभापती वर्षाताई जगताप, जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण, माजी शिक्षण सहसंचालक राजेंद्र बाबर, माजी उपशिक्षणाधिकारी विश्वास फडतरे, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक साईनाथ वाडळेकर, सरपंच दत्तात्रय वाडकर, मुख्याध्यापक संतोष वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मधुकर किसन वाडकर, समाजसेवक आनंदराव चिरगुटे, बाजार समिती संचालक रवी मांढरे, महेंद्र पुजारी, अजित वाडकर, गोरख गोरे, लक्ष्मण पवार, कौशिक कान्हेरे, चरण गायकवाड, सुरेश बाबर यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय दाहोत्रे यांच्यासह हैदराबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवून नॉर्वे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जंप स्पर्धेसाठी निवड झालेली विद्यार्थिनी यशोदा वाडकर हिचा विशेष गौरव करण्यात आला. लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या सई वाडकर आणि अक्षरा फडके यांचाही सन्मान करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल बोरगाव शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिनकरराव कांबळे यांनी संस्थेबद्दलची आत्मीयता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळा, समाज आणि देशावर प्रेम करावे. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि न्यायमूल्यांची जपणूक करावी, असे आवाहन केले. प्रतापराव अण्णा पवार यांनी पश्चिम भागातील अतिवृष्टी आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी आश्रमशाळेचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली.

मकरंद आबा पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि संशोधनवृत्तीचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रगती करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञानाचा उपयोग शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी, नैसर्गिक आपत्तींचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मानवकल्याणासाठी झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बोरगावच्या या संस्थेने चार दशकांपूर्वी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. नांदगणे येथे सुरू केलेली भागशाळा, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली वसतिगृहाची सुविधा आणि सुमारे २५ विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व शिक्षणाचा खर्च उचलण्याचे संस्थेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मकरंद आबांनी सांगितले. संस्थेच्या इमारतीच्या प्रस्तावासाठी १४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कामासाठी खासदार प्रफुल्ल पटेल आणि नितीन काका पाटील यांच्या सहकार्याचाही त्यांनी उल्लेख केला.

विज्ञान प्रदर्शनात खानापूरच्या रुद्र जाधवची बाजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानापूर येथील रुद्र योगेश जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला. कमलाबाई जोशी विद्यालय, केंजळ येथील वैष्णवी विपुल कदम हिने द्वितीय, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उडतरे येथील शौर्य योगेश बाबर याने तृतीय क्रमांक मिळविला. शिक्षक गटात लाखानगर शाळेचे प्रदीप नामदेव गायकवाड प्रथम ठरले.

दिव्यांग लहान गटात श्री शिवाजी विद्यालय, सुरूर येथील सूरज श्रावणकुमार गुप्ता, तर मोठ्या गटात क्रांतिवीर माध्यमिक विद्यालय, कवठे येथील विघ्नेश अजित ससाणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दिव्यांग शिक्षक गटात श्री शिवाजी विद्यालय, शिरूर येथील हर्षल उदयसिंग चव्हाण यांनी बाजी मारली.

प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा, उडतरे येथील शौर्य योगेश बाबर व इशिता मंगेश गुजर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तलजोशी विद्यालय, वाई येथील युगा व तनिष्क भिलारे यांनी द्वितीय, तर जिल्हा परिषद शाळा, ओझर्डे येथील स्वरा व स्वराज श्रीनिवास कुंभार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

माध्यमिक गटात तलजोशी विद्यालय, वाई येथील वेदांत घोडके प्रथम, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे स्मरणिका मांडवे व अथर्व पवार द्वितीय, तर तिरंगा इंग्लिश माध्यमिक विद्यालय, पाचवड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय आसरे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत गाडेकर आणि परखंदी येथील पृथ्वीराज दीपक शिंदे यांचाही गौरव करण्यात आला.

बँड पथकाच्या सादरीकरणाने वेधले लक्ष

बोरगावच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन आणि बँड पथकाचे सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या या बँड पथकाचे मकरंद आबांनी विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक संतोष वाडकर यांनी आभार मानले. विद्यालयाच्या बँड पथकाने सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना शिक्षणाची पंखे देणाऱ्या बोरगावच्या संस्थेचा हा सोहळा केवळ नूतन इमारतीच्या उद्घाटनापुरता मर्यादित राहिला नाही, तर ग्रामीण शिक्षणाची जिद्द, शिक्षकांचे समर्पण, संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा प्रेरणादायी उत्सव ठरला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!