गुणवंत कामगार समाजसेवक राजेंद्र कांबळे यांना ‘संविधान सन्मान पदवी २०२६’ प्रदान
प्रा. अक्षय आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान पदवी २०२६’ सोहळ्यात गुणवंत कामगार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना मानाची संविधान सन्मान पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी परळ येथील संविधान स्तंभ, बी.आय.टी. चाळ क्रमांक ९ येथे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रा. अक्षय आंबेडकर, ॲड. सोपान बुडवाडकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य विलास खानोलकर, मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे आणि पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांच्या हस्ते राजेंद्र कांबळे यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि संविधान सन्मान पदवी प्रदान करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रातील योगदान, कामगारांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत कांबळे यांचा हा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे सामाजिक आणि कामगार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या!
या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परळ, मुंबई येथील ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करून या मागणीला पाठिंबा दर्शविला. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वास्तूचे राष्ट्रीय स्तरावर जतन व संवर्धन व्हावे, तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय व्हावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संविधान विचारांचा जागर; कवितांनी जिंकली उपस्थितांची मने
कार्यक्रमात अनिल साळवी, कविता वाघ, विलास देवळेकर, मोहन जाधव, गुरुदत्त दिनकर वाकदेकर आणि सूरज भोईर यांनी संविधानविषयक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. संविधानातील मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या विचारांचा जागर घडविणाऱ्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या सोहळ्याला मोहन जाधव, ॲड. सोपान बुडवाडकर, मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज भोईर, मुकुंद कांबळे, डॉ. प्रभाकर कांबळे, मनीषा अहिरे, श्याम जाधव, डॉ. संतोष कांबळे, ॲड. अदिती गायकवाड, संतोष खरात, दिलीप कांबळे, विजय केदसे, अमय भोसले, भरत खांडेकर, गिरीश शहा, वैशाली कांबळे, सुवर्णा बामणे आणि संतोष भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सूरज भोईर यांनी संयोजक आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. गुरुदत्त वाकडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. अदिती गायकवाड आणि मुकुंद कांबळे यांनी आभार मानले. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संविधानाच्या विचारांचा सन्मान, सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव आणि ऐतिहासिक स्मारकाच्या जतनाची मागणी अशा त्रिवेणी संगमातून हा संविधान गौरव सोहळा संस्मरणीय ठरला.





















