उत्कर्ष पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा!
प्रतिष्ठेचा ‘सहकार भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान; नवराष्ट्रच्या व्यासपीठावर वाईच्या सहकार क्षेत्राचा गौरव
वाई : प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवभारत वृत्तसमूहाच्या दैनिक ‘नवराष्ट्र’च्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘सहकार भूषण पुरस्कार २०२६’ संस्थेला प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे उत्कर्ष पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीवर मानाची मोहोर उमटली असून, वाईच्या सहकार क्षेत्राचाही सन्मान उंचावला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित ‘नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील तसेच ओम शुगर्सचे ओम बोत्रे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संचालक अमर आनंद कोल्हापुरे, एच.आर. ओमकार अमरेंद्र वनारसे आणि अधिकारी सागर दीपक धोंगडी यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी दैनिक ‘नवराष्ट्र’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक राजेश वरळेकर आणि संपादक संजय मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध सहकारी बँका, पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभासदांचा दृढ विश्वास, पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून उत्कर्ष पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत ग्राहकाभिमुख सेवा आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून संस्थेने प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे. याच सातत्यपूर्ण कार्याची आणि संस्थात्मक गुणवत्तेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सामूहिक योगदानाचा गौरव!
‘सहकार भूषण पुरस्कार २०२६’ हा केवळ संस्थेचा सन्मान नसून संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणारे सभासद, ठेवीदार, ग्राहक, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस निश्चितच नवी प्रेरणा आणि बळ मिळणार आहे. उत्कर्ष पतसंस्थेच्या या यशामुळे वाईच्या सहकार क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





















