शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहा शेतकऱ्यांचे भूदान!
अतिदुर्गम जोर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी वडिलोपार्जित जमीन विनामोबदला अर्पण; आदर्श शाळा उपक्रमाला मिळणार बळ
वाई : प्रतिनिधी
शिक्षणाच्या माध्यमातून गावाचा आणि पुढील पिढीचा विकास व्हावा, या उदात्त भावनेतून वाई तालुक्यातील अतिदुर्गम जोर (जोरवाडी) गावातील सहा कष्टकरी शेतकऱ्यांनी आपल्या मालकीची वडिलोपार्जित शेतजमीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी विनामोबदला अर्पण केली आहे. शेतकऱ्यांच्या या दातृत्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षणविकासाला मोठे बळ मिळणार असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाई तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर असलेले जोर (जोरवाडी) हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेले अतिदुर्गम गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोरची शासनाच्या आदर्श शाळा उपक्रमांतर्गत निवड होण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करता याव्यात, या उद्देशाने गावातील सहा शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.
यामध्ये श्री. तुकाराम चिमाजी यादव, श्री. किसन बाबुराव यादव, श्री. चंद्रकांत राजू यादव, श्री. बबन रामा कोळी, श्री. धोंडीबा रामा कोळी आणि श्री. सदू राजू यादव या शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित मालकीची जमीन शाळेसाठी विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे दिली. या जागेच्या हस्तांतरणाची नोंदणी प्रक्रिया वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पूर्ण करण्यात आली. संबंधित सर्व दस्तऐवज सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्यात आले आहेत.
या महत्त्वपूर्ण कामासाठी वाईचे दुय्यम निबंधक श्री. ओंकार पवार, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. नारायणराव घोलप, गटशिक्षणाधिकारी श्री. हर्षवर्धन मोरे, विस्तार अधिकारी तथा जोर ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. राहुल हजारे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विठ्ठल संकपाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुक्ला भिलारे-पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच दस्तलेखनिक व स्टॅम्प व्हेंडर श्री. प्रकाश बाबर, बाँड रायटर श्री. संतोष शिंदे, शाळेतील शिक्षिका सौ. त्रिवेणी पिंपळे, शिक्षिका सौ. सुप्रिया मुटके, शिक्षक श्री. राहुल शेळके, श्री. संजय निकम, गावातील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी श्री. नारायण सपकाळ, श्री. चिमाजी यादव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सीताबाई बाळकृष्ण साळेकर व सर्व सदस्यांनी या प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
जोर गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि गावातील शाळेचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन शिक्षणासाठी दिल्यामुळे भविष्यात शाळेच्या विस्तारासाठी आणि विविध शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा कोणताही मोबदला न घेता ती गावातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित केली आहे. ‘आपल्या पुढच्या पिढीने शिक्षण घेऊन गावाचे नाव मोठे करावे आणि या शैक्षणिक परिवर्तनात आमचाही खारीचा वाटा असावा,’ ही भावना या शेतकऱ्यांच्या कृतीतून व्यक्त झाली.
शिक्षणासाठी जमिनीचे दान करणाऱ्या या सहाही शेतकऱ्यांचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आभार मानले. ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही परिवर्तन घडवता येते, याचा आदर्श जोर गावातील या शेतकऱ्यांनी समाजासमोर ठेवला आहे.





















