६७० अंगणवाड्यांतून बालशिक्षणाची नवी पहाट!
रोटरीच्या ग्लोबल ग्रँटमधून ‘रोटरी कुतूहल अंगणवाडी’ प्रकल्पाचा शुभारंभ; ७,८०० पालकांचे सक्षमीकरण, ८,००० बालकांच्या शालेय पूर्वतयारीवर भर
वाई, दि. २५ : ग्रामीण भागातील बालशिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्याबरोबरच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वाईच्या वतीने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रोटरी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून वाई आणि खंडाळा तालुक्यांतील तब्बल ६७० अंगणवाड्यांमध्ये ‘रोटरी कुतूहल अंगणवाडी’ हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार असून, या उपक्रमातून ७,८०० पालकांचे सक्षमीकरण आणि ८,००० बालकांच्या शालेय पूर्वतयारीवर विशेष भर दिला जाणार आहे. या २४ महिन्यांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ वाई येथे उत्साहात झाला.
३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) विकसित करणे, त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण करणे तसेच बालशिक्षणाच्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, मुलांचे शिक्षण केवळ अंगणवाडीपुरते मर्यादित न राहता घरातूनही प्रभावीपणे सुरू राहावे, यासाठी पालकांना आवश्यक मार्गदर्शन आणि शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी प्रांतपाल सुधीर लातुरे, डिस्ट्रिक्ट रोटरी फाउंडेशनच्या चेअर व माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ, रोटरी क्लब ऑफ वाई व खडकी पुणेचे सदस्य, ज्ञान प्रकाश फाउंडेशनचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि पालक उपस्थित होते.
ज्ञान प्रकाश फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर प्रणव पेंडसे यांनी प्रकल्पाची संकल्पना, उद्दिष्टे आणि अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती दिली. स्वानंदी पवार यांनी पालक, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.
माता पालक सभांमधून शिक्षणाला घराघरांत पोहोचविणार!
प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दर महिन्याला ‘माता पालक सभा’ आयोजित केल्या जाणार आहेत. बालविकास, खेळातून शिक्षण, भाषा विकास, पूर्वगणित, कला आणि सामाजिक-भावनिक विकास अशा आठ महत्त्वपूर्ण विषयांवर पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सॲपच्या माध्यमातून १०७ शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याद्वारे पालकांना घरच्या घरी मुलांच्या शिक्षणात सहभागी होता येणार आहे.
यावेळी प्रकल्प प्रमुख स्वाती हेरकळ यांनी बालशिक्षणातील पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांचे शिक्षण घरातून सुरू होते. गोष्टी सांगणे, मुलांसोबत खेळणे, त्यांच्याशी संवाद साधणे अशा साध्या कृतींतूनही मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास साधता येतो. अंगणवाडी स्तरावर पोषण बाग विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
माजी प्रांतपाल सुधीर लातुरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वेलबिईंग इंटरनॅशनल (इंग्लंड), डेन्व्हर, फोर्ट कॉलिन्स, ह्युस्टन (अमेरिका) आणि प्रगती फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ज्ञान प्रकाश फाउंडेशन व शासकीय यंत्रणेच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे स्वागत रोटरी क्लब ऑफ वाईच्या अध्यक्षा अनघा दातार यांनी केले. सूत्रसंचालन रो. सोनाली शिंदे यांनी केले, तर आभार रो. कुणाल शहा यांनी मानले. सेक्रेटरी अनुराधा जोशी, डॉ. मनोहर दातार, दीपक बागडे, मनीषा पोरे, नीलम भोसले, नीला कुलकर्णी, मुकुल हिंगसे, विवेक भंडारे, प्रमोद शिंदे, संजीवनी कद्दू आणि पूरब शहा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष योगदान दिले.
बालशिक्षणाच्या पायाभरणीसाठी लोकसहभागाचा आदर्श
ग्रामीण भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षणाची संधी मिळावी, पालकांना बालविकासाचे महत्त्व समजावे आणि अंगणवाडी ही केवळ पोषण व देखभालीची व्यवस्था न राहता बालकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी केंद्र बनावे, या दिशेने रोटरीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ६७० अंगणवाड्यांमधील या उपक्रमातून वाई-खंडाळा तालुक्यांच्या ग्रामीण शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





















