बोरगावमध्ये २७ व २८ नोव्हेंबरला विज्ञानाचा जागर!
खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत समारोप
वाई : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, कल्पकता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणारे ५४ वे वाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार, दि. २७ व शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी बोरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्यसभेचे खासदार नितीन (काका) पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.
सातारा जिल्हा परिषद, शिक्षण विभाग पंचायत समिती वाई आणि वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ, बोरगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव व भागशाळा नांदगणे यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या प्रदर्शनासाठी ‘शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता खासदार नितीन (काका) पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव (बापू) शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रांत (भैय्या) डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे, उपसभापती वर्षाताई जगताप, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, संस्थेचे अध्यक्ष नारायणराव वाडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विज्ञानाच्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे प्रकल्प
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती, प्रयोग, संशोधनात्मक प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या जाणार आहेत. गणितीय प्रतिकृतीकरण व संगणकीय विचारसरणी, आरोग्य, स्वच्छता व स्वच्छताविषयक सुविधा, देशी व स्थानिक कृषी पद्धती, ग्रामीण परिवर्तनासाठी विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांचा यात समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेची ओळख करून देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत समारोप
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, शिक्षणाधिकारी शर्वण मुजावर, उपशिक्षणाधिकारी शिवाजी मलदोडे, माजी शिक्षण सहसंचालक राजेंद्र बाबर, माजी उपशिक्षणाधिकारी विश्वास फडतरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष नारायणराव वाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
दोन दिवस शैक्षणिक उपक्रमांची मेजवानी
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सहभागी शाळांची प्रवेश व नावनोंदणी प्रक्रिया होईल. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत प्राथमिक गटासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे.
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत माध्यमिक गटाची प्रश्नमंजुषा स्पर्धा, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत परीक्षण व निकाल संकलन आणि त्यानंतर दुपारी १ वाजता समारोप समारंभ होईल.
आयोजकांचे विशेष परिश्रम
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरखनाथ गोरे, वाई तालुका विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष लालासो शिंदे, केंद्रप्रमुख विशाल गिरी, न्यू इंग्लिश स्कूल बोरगावचे मुख्याध्यापक संतोष वाडकर, भागशाळा प्रमुख विठ्ठल जाधव, शिक्षक प्रतिनिधी अजित वाडकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आयोजक परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुणांना वाव देणारे, संशोधनवृत्ती विकसित करणारे आणि विज्ञानाची गोडी निर्माण करणारे हे प्रदर्शन वाई तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या प्रदर्शनाचा विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे स्थळ : सर सी. व्ही. रमण विज्ञान नगरी, न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव, ता. वाई, जि. सातारा.





















