वाईच्या प्रवेशद्वारावर लवकरच शिवरायांचा भव्य पुतळा!
शिवस्मारकाचे काम अंतिम टप्प्यात; मकरंद पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन शिल्पकामाचा घेतला आढावा
वाई : प्रतिनिधी
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची समृद्ध परंपरा लाभलेल्या वाई शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर, न्यायालयासमोरील मोक्याच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाच्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महाराजांच्या मुख्य पुतळ्याचे शिल्पकाम कोल्हापूर येथे सुरू आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कोल्हापूर येथे शिल्पकारांच्या कार्यशाळेला भेट देऊन पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
स्वराज्याच्या इतिहासात वाई प्रांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा लाभलेल्या या भूमीत महाराजांचे भव्य स्मारक उभारले जावे, ही वाईकरांची अनेक वर्षांपासूनची अपेक्षा होती. शहराच्या प्रवेशद्वारावर साकारले जाणारे हे स्मारक वाईच्या ऐतिहासिक वैभवात भर घालण्याबरोबरच भावी पिढ्यांसाठी शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रेरणास्थान ठरणार आहे.
दरम्यान, काही तांत्रिक अडचणी तसेच आवश्यक कच्च्या मालाच्या उपलब्धतेमुळे पुतळ्याच्या कामाला काहीसा विलंब झाला होता. मात्र, शिल्पकामासाठी आवश्यक असलेला मोठा निधी यापूर्वीच संबंधित शिल्पकारांना वर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांनी कोल्हापूर येथील कार्यशाळेला भेट देत पुतळ्याची रचना, कलाकुसर, शिल्पकामाचा दर्जा आणि कामाच्या सद्यस्थितीची बारकाईने माहिती घेतली.
शिवस्मारकाचे काम दर्जेदार आणि आकर्षक स्वरूपात पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी संबंधित शिल्पकारांशी चर्चा केली. तसेच हे ऐतिहासिक काम अधिक विलंब न करता तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
स्मारकाच्या चौथऱ्याचे काम पूर्णत्वाकडे जात असताना पुतळ्याच्या शिल्पकामाचाही मंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू झाल्याने वाईकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वाईच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि आकर्षक पुतळा विराजमान झाल्यानंतर हे स्मारक शहराचे प्रमुख आकर्षण आणि ऐतिहासिक ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत ऊर्फ भैय्या डोंगरे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, नगरसेवक भारत खामकर, डॉ. अमर जमदाडे, संग्राम (पप्पू) पवार, संदीप जावळे, गुरुप्रसाद (सनी) चव्हाण, सुशील खरात, संदीप नायकवडी, शब्बीर पठाण, पप्पू हागीर, महेश काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.





















