Sat, Nov 28, 2026
सातारा जिल्हा

दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत ठेवा!

दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत ठेवा!
Ashok Ithape
  • PublishedNovember 8, 2026

ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रशासनासह मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त निर्देश; नवीन टॉवर उभारणीसह तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून, अनेक गावांमध्ये मोबाईलला रेंज नसल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या गांभीर्याने घेऊन जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सेवा कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने करा, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासन आणि मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.

सातारा-जावळी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील दुर्गम डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्क सेवा अनियमित आणि विस्कळीत असल्याने नागरिकांना दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

सातारा-जावळी तालुक्यातील ठोसेघर, परळी विभाग, रांजणी, मार्ली, बामणोली परिसर तसेच खटाव तालुक्यातील मांजरवाडी, डिस्कळ यांसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या तीव्र आहे. या भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक तसेच पर्यटकांना मोबाईल संपर्कासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत मदत मागणे, शासकीय ऑनलाइन सेवा वापरणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाज आणि डिजिटल आर्थिक व्यवहार करणेही नेटवर्कअभावी कठीण होत आहे.

डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही केवळ संपर्काची सुविधा नसून, ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज बनली आहे. सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असून, ठोसेघर, कास, बामणोली आणि महाबळेश्वर परिसरासह अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. या परिस्थितीत बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

ज्या भागांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तेथे नेटवर्क कव्हरेज वाढविणे, आवश्यकतेनुसार नवीन मोबाईल टॉवर उभारणे, बंद असलेले टॉवर तातडीने सुरू करणे, कमी क्षमतेने कार्यरत असलेल्या टॉवरची क्षमता वाढविणे आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा करणे यावर संबंधित कंपन्यांनी प्राधान्याने काम करावे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार नेटवर्क सेवा मिळेल, यासाठी कालबद्ध नियोजन करून कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, दिलीप बाबर, सातारा पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी इनामदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच बीएसएनएल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडिया या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक डिजिटल सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, तसेच सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांनाही अखंडित मोबाईल नेटवर्क सेवा मिळावी, यासाठी प्रशासन आणि मोबाईल कंपन्यांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असा ठाम निर्धार ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बैठकीत व्यक्त केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!