सातारा जिल्हा बँकेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव!
![]()
१० वर्षांहून अधिक काळ ISO 9001 मानांकन कायम; BSI ग्रुप इंडियाकडून विशेष सन्मान
सातारा : प्रतिनिधी – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या बळावर १० वर्षांहून अधिक काळ ‘ISO 9001’ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन कायम राखले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित बीएसआय ग्रुप इंडिया प्रा. लि. या संस्थेकडून बँकेचा विशेष सन्मान करण्यात आला.
बीएसआय कंपनीचे भारतातील प्रतिनिधी रत्नदीप कौटुले यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी प्रोसेस लॉजीक्स कन्सल्टिंग कंपनीचे सत्यजित ढमढेरे, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे आणि अधीक्षक रवींद्र उंबरकर उपस्थित होते.
ग्रामीण भागापर्यंत गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा
बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील म्हणाले, की बँकेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या सेवांचे जाळे विस्तारले असून, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली आहे. ISO मानांकन, ‘अ’ लेखापरीक्षण वर्ग, शून्य टक्के निव्वळ एनपीए आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समधील नोंद ही बँकेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाची पावती आहे. हे यश संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०११ मध्ये प्रथम ISO मानांकनाचा बहुमान
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले, की बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन सातारा जिल्हा बँकेने आपल्या कार्यप्रणालीत सातत्याने आवश्यक बदल केले आहेत. बँकेने २०११ मध्ये प्रथमच ‘ISO 9001:2008’ हे मानांकन मिळविले. त्यावेळी देशातील ISO मानांकन प्राप्त करणारी पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा बहुमान बँकेला मिळाला होता.
त्यानंतर बदलत्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्यात आल्या. २०२१ मध्ये बँकेने ‘ISO 9001:2015’ हे मानांकन प्राप्त केले. नियमित पुनर्प्रमाणन लेखापरीक्षणाच्या माध्यमातून बँकेने गुणवत्तेचे निकष सातत्याने कायम ठेवले आहेत.
गेल्या ७६ वर्षांच्या परंपरेत बँकेने सातत्यपूर्ण नफा, उत्कृष्ट कर्जवसुली आणि सामाजिक बांधिलकी जपत पारदर्शक कामकाजाला प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ISO मानकांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकसेवेचा दर्जा अधिक उंचावला असून, भविष्यातही आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे डॉ. सरकाळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बीएसआय कंपनीचे डायरेक्टर रत्नदीप कौटुले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले.





















