Wed, Oct 21, 2026
सामाजिक

ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांना ‘भुईंज भूषण’ पुरस्कार!

ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांना ‘भुईंज भूषण’ पुरस्कार!
Ashok Ithape
  • PublishedOctober 21, 2026

दीनबंधू मित्र मंडळाचा गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व कामगार गौरव सोहळा उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

भुईंज : प्रतिनिधी

दीनबंधू मित्र मंडळ, भुईंज यांच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व कामगार गौरव सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव (आबा) यांना मानाचा ‘भुईंज भूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. निवृत्त कर्नल अभयसिंह विजयसिंह पिसाळ-देशमुख आणि डीवायएसपी पूनम झगडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महात्मा फुले सभागृह, फुलेनगर, भुईंज येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्राचार्य आर. एस. पाटील, मंडळाचे अध्यक्ष सुनील शेवते आणि उद्योजक प्रशांत भोसले-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने आयोजित वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धांतील यशस्वी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. परिसरातील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आणि आदर्श कामगारांचाही सन्मान करण्यात आला.

देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश

सोहळ्यादरम्यान निवृत्त कर्नल अभयसिंह पिसाळ-देशमुख आणि डीवायएसपी पूनम झगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या विचारांतून त्यांनी देशसेवेचे महत्त्व, कर्तव्याप्रती निष्ठा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव जोपासून जीवनात यशस्वी व्हावे, असा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव दत्तात्रय शेवते यांनी केले. यावेळी विनोद बनकर, सचिन शेवते, अमोल शेवते, अमित लोखंडे, योगेश दगडे, संदीप जायकर, संजय बोराटे, सयाजी दगडे, सौ. अंजना विठ्ठल शेवते, सतीश फरांदे, अमोल बनकर, अर्चना बाबासाहेब झोरे, सुवर्णा राजेंद्र दगडे, राहुल शेवते आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव अशा विधायक उपक्रमातून दीनबंधू मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!