संस्कार भारतीच्या कथाकथन स्पर्धेत अमितकुमार शेलार प्रथम
ओघवत्या सादरीकरणाने जिंकली रसिकांची दाद; पुण्यातील अंतिम फेरीसाठी निवड
भुईंज : महेंद्रआबा जाधव
मराठी साहित्यविश्वातील अजरामर त्रिमूर्ती ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील, द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारती, सातारा जिल्हा समितीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत अमितकुमार शेलार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या ओघवत्या आणि प्रभावी कथाकथन शैलीने त्यांनी रसिकांची दाद मिळवली. या यशामुळे त्यांची पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
भुईंज येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहू सभागृहात रंगलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत सुधाकर माने यांनी द्वितीय, तर साईशा केसकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ईशान केसकर आणि मुग्धा देशपांडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण शेखर कुलकर्णी आणि नरेंद्र आमले यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. युवा उद्योजक शिवराज ढाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नव्या पिढीत समृद्ध मराठी साहित्याची अभिरुची रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
संस्कार भारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. परीक्षक शेखर कुलकर्णी यांनी कथाकथन हा मराठी मातीचा समृद्ध; मात्र काहीसा दुर्लक्षित कलाप्रकार असून, त्याला नवसंजीवनी देण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दुसरे परीक्षक नरेंद्र आमले यांनी कथाकथनात केवळ भाषेचे सौंदर्य पुरेसे नसून श्रोत्यांना नवरसांचा जिवंत प्रत्यय मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. अस्सल बोलीभाषेचा लहेजा कथेला अधिक जिवंत करतो, असा मौलिक कानमंत्र त्यांनी स्पर्धकांना दिला.
बहुतांश स्पर्धकांनी शंकर पाटील, द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या ग्रामीण जीवनाशी नाते सांगणाऱ्या, मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या कथा प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे संयोजन संस्कार भारतीच्या नाट्यविधा प्रमुख रसिका केसकर यांनी केले. त्यांना वर्षा साबडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रचार प्रमुख मुकुंद फडके यांनी केले, तर वर्षा साबडे यांनी आभार मानले.
यावेळी संस्कार भारतीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, सचिव प्रदीप इनामदार, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष अभय पटवर्धन, सहसचिव संजीव आरेकर, प्रांत सदस्य मधुसूदन पत्की, कोषप्रमुख केशव कुलकर्णी यांच्यासह साहित्यप्रेमी, पदाधिकारी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांसोबत संस्कार भारतीचे सातारा जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर, सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण तसेच साहित्यप्रेमी व पदाधिकारी.





















