ज्ञानदीपच्या शुभांगी पवार, दिशा पब्लिकचे ताज्युद्दिन सय्यद, गुरुकुलच्या अनुराधा कदम यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार
ब्लॉसमच्या पौर्णिमा शिर्के यांना ‘बेस्ट शिक्षिका’; सातारा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गौरव
वाई, दि. २८ (प्रतिनिधी) : इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन, कोल्हापूर (EMSA) या राज्यस्तरीय मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून पुरस्कारासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव प्राप्त झाले होते. निर्धारित निकषांच्या आधारे प्रस्तावांची छाननी व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून निवडक मुख्याध्यापक व शिक्षकांची अंतिम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सोहळ्यात राज्यातील १५ मुख्याध्यापक आणि ३८ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सोहळ्याचे उद्घाटन EMSA कोल्हापूर असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा प्रमुख सचिन नाईक, राधानगरी तालुका प्रमुख दत्तात्रय रणदिवे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष महेश पोळ यांनी शिक्षकांच्या कार्याचा समाजाने सन्मान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा पुरस्कार सोहळ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. वाई येथील ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या कु. शुभांगी पवार यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच दिशा पब्लिक स्कूलचे प्राचार्य ताज्युद्दिन सय्यद, ग्लोरी अकॅडमीच्या प्राचार्या सौ. मीना चौधरी, गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या अनुराधा कदम आणि आदित्य अकॅडमीचे प्राचार्य इरफान पठाण यांनाही राज्यस्तरीय ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक पुरस्कारामध्ये ब्लॉसमच्या शिक्षिका सौ. पौर्णिमा शिर्के, जॉय अकॅडमीच्या शिक्षिका राजश्री तरडे, ग्लोरी शिरवळच्या शिक्षिका वैशाली भणगे आणि बालविश्व वाठारचे शिक्षक सागर कुंभार यांचा राज्यस्तरीय ‘बेस्ट शिक्षिका’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यावर्धिनी संस्थेचे विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, दुष्यंत जगदाळे, दिलीप चव्हाण, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्ञानज्योत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमोल बोडके यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरावर सातारा जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.





















