Sat, Sep 5, 2026
अध्यात्म

कृष्णामाईचे पूजन, महागणपतीचे दर्शन; सीबीडीटी अध्यक्ष रवी अगरवाल यांची दक्षिण काशीला भेट

कृष्णामाईचे पूजन, महागणपतीचे दर्शन; सीबीडीटी अध्यक्ष रवी अगरवाल यांची दक्षिण काशीला भेट
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2026

कृष्णा नदीचे पूजन करून घेतले महागणपतीचे दर्शन; ऐतिहासिक घाट व मंदिरांच्या वास्तुकलेचे केले कौतुक

वाई : प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे आयोजित प्राप्तिकर विभागाच्या पश्चिम विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष रवी अगरवाल यांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र दक्षिण काशी वाई येथील श्री महागणपती मंदिरास सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.

वाई येथे आगमनानंतर रवी अगरवाल यांनी सर्वप्रथम पवित्र कृष्णा नदीचे पूजन केले. त्यानंतर श्री महागणपती मंदिरात विधिवत अभिषेक व आरती करून महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ऐतिहासिक श्री काशी विश्वेश्वर मंदिरासही भेट देऊन दर्शन घेतले.

वाईच्या ऐतिहासिक घाटांची रचना, घाटांवरील प्राचीन मंदिरे आणि त्यांची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. महागणपती व काशी विश्वेश्वर मंदिरातील भव्य नंदी, मंदिराच्या मंडपाची प्राचीन स्थापत्यशैली तसेच मंदिरांवरील कलाकुसरीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी प्राप्तिकर विभागाचे पुणे येथील महासंचालक (अन्वेषण) जगजीवन कुमार गर्ग, प्रमुख मुख्य प्राप्तिकर आयुक्त विवेक वाडेकर, प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक (अन्वेषण) तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे विश्वस्त विश्वास गोखले, सी.ए. सी.व्ही. काळे तसेच वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अरुण देव यांनी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. या प्रसंगी प्राप्तिकर विभागातील अधिकारी, मंदिर विश्वस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : वाई येथील श्री महागणपती मंदिरात आरती करताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अगरवाल. यावेळी जगजीवन कुमार गर्ग, विवेक वाडेकर, प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक (अन्वेषण) व अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त विश्वास गोखले, सी.ए. सी.व्ही. काळे आणि अरुण देव आदी.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!