Fri, Jun 19, 2026
सामाजिक

पाच वर्षे झाली सर… पण अजूनही वाटतं, तुम्ही कुठेतरी इथेच आहात!

पाच वर्षे झाली सर… पण अजूनही वाटतं, तुम्ही कुठेतरी इथेच आहात!
Ashok Ithape
  • PublishedJune 19, 2026

– सुरेश बिरामणे सर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त

काही माणसं जगातून निघून जातात, पण त्यांच्या जाण्याची सवय कधीच होत नाही.काळ पुढे सरकत राहतो, ऋतू बदलतात, वर्षं उलटतात, पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ती व्यक्ती तशीच जिवंत राहते.जिंदादिल सुरेश बिरामणे सर हे असंच एक व्यक्तिमत्त्व…आज सरांना जाऊन पाच वर्षे झाली.

पाच वर्षे…!कागदावर लिहायला खूप छोटा आकडा.पण ज्यांनी सरांना जवळून पाहिलं, अनुभवले, ज्यांच्या आयुष्याला त्यांनी स्पर्श केला, त्यांच्यासाठी ही पाच वर्षे म्हणजे एक मोठी पोकळी आहे.आजही पाचगणीच्या रस्त्यावरून जाताना, विद्यानिकेतनच्या भव्य इमारतीकडे पाहताना, एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमात उपस्थित राहताना किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये त्यांचा विषय निघाला की मन नकळत भूतकाळात जाऊन पोहोचतं…
आणि वाटतं…

आता सर कुठूनतरी त्यांच्या त्या खास हास्यासह समोर येतील.त्यांच्या नव्या ‘6101’ या गाडीतून…!
“काय सचिन, काय म्हणताय?आपले पांडव पत्रकार कुठं आहेत” असं विचारतील.

आणि पुन्हा एकदा पाचगणीच्या शिक्षणाबद्दल,समाजकारण,पाचगणी युथ फोरम,.नव्या जुन्या नगरसेवक विशेषतः लक्ष्मी कऱ्हाडकर,राजश्री वहिनी,नारायण बिरामणे,अन शेखर कासुर्डे यांच्याबद्दल तासन्तास बोलत बसतील…!पण ते आता फक्त आठवणीत उरलं आहे.
सुरेश सर हे केवळ शिक्षणसंस्थेचे संचालक नव्हते.ते एक स्वप्न पाहणारे माणूस होते.स्वप्न पाहणारे अनेक असतात.पण त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी स्वतःचं आयुष्य झोकून देणारे फार कमी असतात.

पाचगणीसारख्या डोंगररांगांमध्ये उभं राहिलेलं विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज हे फक्त एक विद्यालय नाही.ती सुरेश सरांची स्वप्नपूर्ती आहे.त्यांच्या कष्टांची, जिद्दीची आणि दूरदृष्टीची जिवंत साक्ष आहे.ज्या काळात सीबीएसई शिक्षण,आधुनिक सुविधा आणि निवासी कॉलेज शिक्षणाची संकल्पना ग्रामीण भागात धाडसी वाटत होती, त्या काळात त्यांनी हे स्वप्न पाहिलं.अडचणी आल्या.अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.काहींनी अशक्य म्हटलं.पण सरांच्या शब्दकोशात “अशक्य” हा शब्दच नव्हता.

त्यांनी स्वप्न पाहिलं…ते जपलं…आणि ते पूर्ण करून दाखवलं.आज हजारो विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची दूरदृष्टी उभी आहे.
पण सुरेश सरांचं मोठेपण केवळ त्यांनी उभारलेल्या इमारतींमध्ये नव्हतं.ते होतं त्यांनी जोडलेल्या माणसांमध्ये.त्यांच्याकडे एक विलक्षण देणगी होती…माणूस जोडण्याची.एकदा जो त्यांच्या संपर्कात आला तो कायमचा त्यांचा होऊन जायचा.

त्यांच्या मैत्रीला सीमा नव्हती.पद, पैसा, जात, धर्म, राजकारण यापलीकडे जाऊन त्यांनी नाती जपली.अनेकांच्या अडचणीच्या काळात ते आधार बनले.अनेकांच्या डोळ्यातील अश्रू त्यांनी पुसले.अनेकांना उभं राहण्यासाठी खांदा दिला.त्यांच्या मदतीचे ,मैत्रीचे अनेक किस्से आहेत..पण ते त्यांनी कधीच प्रकाशात येऊ दिले नाहीत.उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही कळू नये, अशी त्यांची वृत्ती होती.

आजारपणाने त्यांना घेरलं तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न होता…इतका धडाडीचा माणूस हे संकट कसं स्वीकारेल?
पण सरांनी संकटालाही आपल्या शैलीत सामोरं गेलं.

चेहऱ्यावर हास्य.
डोळ्यात आत्मविश्वास.
आणि मनात आशा.
अगदी शेवटच्या दिवसापर्यंत…!
ते स्वतः आजाराशी लढत होते.पण भेटायला येणाऱ्यांनाच धीर देत होते.अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सर म्हणत होते…
“डोन्ट वरी,मी यातून बाहेर पडेन…”
पण नियतीने घाव घातलाच..!
त्यामुळेच त्यांच्या जाण्याची बातमी स्वीकारणं अनेकांना आजही कठीण जातं.

आज पाच वर्षांनंतरही कधी कधी मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. आजही वाटतं… सर अजूनही त्यांच्या घरासमोरच्या अंगणात बसले असतील.कॉलेजच्या कामांचा आढावा घेत असतील..रून फणसासारखा कडक वाटणारा सुरेश भाई आतून एकदम संवेदनशीलपणे,हळुवारपणे कोणाला तरी मदतीचा फोन करत असतील.एखाद्या मित्राला चहा पाजत असतील.किंवा नेहमीप्रमाणे म्हणत असतील…

“काळजी करू नका, सगळं ठीक होईल.”
पण मग वास्तव समोर उभं राहतं.
आणि जाणवतं…
सर आता प्रत्यक्षात नाहीत.
पण खरंच नाहीत का?
विद्यानिकेतनच्या प्रत्येक भिंतीत ते आहेत.
‘भारती’ वहिनीच्या प्रत्येक निर्णयात.. लाडक्या ‘विराज’ च्या नजरेत,’विद्या’ च्या वैद्यकीय सेवेत सर्वत्र ते आहेत.
हजारो विद्यार्थ्यांच्या यशात ते आहेत.
मित्रांच्या आठवणींमध्ये ते आहेत.
त्यांनी मदत केलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रार्थनेत ते आहेत.
पाचगणीच्या शैक्षणिक इतिहासात ते आहेत.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे…
असंख्य हृदयांमध्ये ते आजही जिवंत आहेत.
पाच वर्षांपूर्वी नियतीने तुमचा देह हिरावून घेतला सर…
पण तुमचं अस्तित्व नाही.
कारण काही माणसं मरत नाहीत.
ती आठवणी बनून जगतात.
प्रेरणा बनून जगतात.
आधार बनून जगतात.
तुम्ही त्यापैकीच एक…!

आज तुमच्या पाचव्या पुण्यस्मरणदिनी डोळे पुन्हा एकदा ओलावले आहेत.
मन पुन्हा एकदा भरून आलं आहे.
आणि ओठांवर नकळत एकच वाक्य येतं…
“जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहीये…!”
सर,आपण खूप ‘मोठं’ आयुष्य जगून गेलाय..!आपणास
भावपूर्ण, कृतज्ञतापूर्ण आणि अश्रूपूर्ण अभिवादन!

– सचिन ननावरे, पाचगणी

9823985253

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!