Fri, Jun 19, 2026
स्थानिक बातम्या

वाईतील रस्ते कामात गंभीर त्रुटी; शिवसेना कामगार सेनेची पाहणी, कारवाईची मागणी

वाईतील रस्ते कामात गंभीर त्रुटी; शिवसेना कामगार सेनेची पाहणी, कारवाईची मागणी
Ashok Ithape
  • PublishedJune 18, 2026

डांबरीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; तांत्रिक निकषांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप

वाई, दि. १८ : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत काल संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचा दावा शिवसेना कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पाहणीदरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी रस्त्याची जाडी अपुरी असल्याचे, तसेच योग्य प्रकारे रोलिंग करण्यात आले नसल्याचे आढळून आले. रस्त्याच्या कडेला समतोल राखण्यात आलेला नसून पृष्ठभागावर खडी व डांबराचे मिश्रणही एकसमान नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याचा पृष्ठभाग खडबडीत असल्याने भविष्यात रस्ता उखडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

या सर्व बाबींची सविस्तर माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत माने यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या निधीचा अपव्यय करू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिवसेना कामगार सेना नागरिकांच्या कररूपी पैशातून होणाऱ्या विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. दर्जाहीन कामे, भ्रष्टाचार आणि जनतेची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हा संघटक सातारा आणि रोजगार हमी समिती सदस्य योगेश सीता आनंदराव फाळके यांनी जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून निकृष्ट कामांना कडाडून विरोध केला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!