Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

क्राईम न्यूज

साताऱ्यात अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’ उद्ध्वस्त ; बेकायदा कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा

साताऱ्यात अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’ उद्ध्वस्त ; बेकायदा कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा
Ashok Ithape
  • PublishedMay 24, 2026

कोरेगावातील अपार्टमेंटमधून १७ जण ताब्यात, ५ अटकेत; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून डॉलरमध्ये उकळले जात होते पैसे

सातारा : अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून फसवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बेकायदा कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी’ या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

पोलिसांनी केलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, अमेरिकन नागरिकांचा डेटा, संपर्क तपशील, लॅपटॉप, मोबाइल तसेच २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दीपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हे सर्व संशयित मुंबई आणि परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून विविध कारणांनी धमकावत ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचे सांगत होते. तसेच तुमच्या नावाने ॲमेझॉनवरून खरेदी झाली असल्याचे सांगून नागरिकांना घाबरवले जात होते. संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारल्यास बनावट ऑर्डर क्रमांक आणि संदेश पाठवून विश्वास निर्माण केला जात होता. त्यानंतर “ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करा” किंवा “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत पैसे उकळले जात होते. फसवणुकीसाठी प्रामुख्याने डॉलर व्यवहारांचा वापर होत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

छोट्या गावात कॉल सेंटर सुरू केल्यास कोणालाही संशय येणार नाही, या उद्देशाने कोरेगावची निवड करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. या कॉल सेंटरचे कामकाज रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा तपास राज्य आणि केंद्र शासनाच्या तपास यंत्रणांच्या मदतीने केला जाणार असून, गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांचीही मदत घेतली जाईल, असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले. अमेरिकन नागरिकांचा डेटा आरोपींकडे कसा आला, आतापर्यंत किती आर्थिक उलाढाल झाली, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, पैसे कशा पद्धतीने परदेशात पाठवले जात होते, याचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अमेरिकन तपास यंत्रणांशी समन्वयाची शक्यता

या सायबर फसवणुकीचे धागेदोरे परदेशाशी संबंधित असल्याने सातारा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांशी समन्वय साधला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट ई-कॉमर्स व्यवहार आणि गिफ्ट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!